कीर्तीकर-वायकर यांच्यात बिग फाईट | पुढारी

कीर्तीकर-वायकर यांच्यात बिग फाईट

राजन शेलार

मुंबईतील सहा मतदार संघांपैकी तीन मतदार संघात शिवसेना (एकनाथ शिंदे) विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशी लढत होणार आहे. त्यापैकी मुंबई उपनगरातील उत्तर पश्चिम मुंबई हा एक मतदारसंघ आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आलेले उपनेते व युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांना शिंदे गटात गेलेले माजी राज्यमंत्री व जोगेश्वरी पूर्वचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांचा सामना करावा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले वायकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवत मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी खेळी खेळली आहे. दोन्ही पक्षांसाठी ही लढाई अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची असल्याने कीर्तीकर व वायकर यांच्यात ‘बिग फाईट’ होणार, यात वादच नाही. विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार ईडी चौकशीला सामोरे गेले असल्याने त्यांच्यातील अस्तित्वाच्या लढाईत मतदारांचा कौल कोणाला मिळतो आणि दिल्ली कोण गाठणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेतील बंडाळीनंतर प्रथमच शिंदे गट व ठाकरे गट लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि तितकीच निर्णायकी ठरणार आहे. कारण या निवडणुकीवरच तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान उत्तर पश्चिम मुंबईतील विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी त्यांचे चिरंजीव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तीकर हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. महायुतीमध्ये हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आला होता. परंतु, मुलाला उमेदवारी मिळाल्याने खासदार गजानन कीर्तीकर यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने पिता-पुत्रामधील संघर्ष टळला गेला.

महायुतीमधील शिवसेनेने उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात आपला उमेदवारच घोषित केला नव्हता. त्यामुळे या मतदार संघातून शिंदेंची शिवसेना कोणाला उमेदवारी देणार, याकडे अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागले होते. या मतदार संघातून जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर, काँग्रेसने हकालपट्टी केलेले माजी खासदार संजय निरुपम, यांच्यासह बॉलीवूडचा ‘हिरो नंबर वन’ अभिनेता गोविंदा याचेही नाव चर्चेत होते. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मुलाचेही नावही या जागेसाठी चर्चेत होते. यावरून गजानन कीर्तीकर आणि कदम यांच्यात शाब्दिक युद्धही रंगले होते. परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांची समजूत काढून वादावर पडदा टाकला. मात्र, शिंदे यांनी खेळी करत एकेकाळी उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले सहकारी वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत अमोल कीर्तीकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

गजानन कीर्तीकर हे या मतदार संघातून दोनवेळा लोकसभेची निवडणूक जिंकून दिल्लीला गेले आहेत. कीर्तीकरांची या मतदार संघात ताकद आहे. त्यामुळे वायकरांपुढे कीर्तीकरांच्या मुलाचा पराभव करणे हे मोठे आव्हान असले, तरी खासदार कीर्तीकरांची ताकद यावेळी मुलाच्या पाठीशी असेल की वायकरांसोबत असेल, हे आता मतदानातून समोर येणार आहे.

अमोल कीर्तीकर व रवींद्र वायकर हे दोघेही एकेकाळी जवळचे असलेले मित्र आता निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या एकेकाळच्या अत्यंत निकटवर्तीयांमध्ये मानले जात होते. फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाल्यानंतर वायकर यांच्याकडे गृहनिर्माण खात्याच्या राज्यमंत्री पदाबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पदही सोपविण्यात आले होते. वायकर हे जोगेश्वरी पूर्व येथून शिवसेनेचे चारवेळा नगरसेवक व तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मुंबई महानगरपालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणार्‍या स्थायी समितीचे वायकर यांनी अध्यक्षपदही भूषविले होते.

पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात

रवींद्र वायकर हे नगरसेवक व आमदार अशा भूमिकेतून गेले असले, तरी ते प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी निवडणुकीचा अनुभव असला तरी उमेदवारी उशिराने जाहीर झाल्याने त्यांच्यासमोर प्रचाराचे मोठे आव्हान असणार आहे. भाजप आमदारांच्या मदतीने वायकर हे आव्हान कसे पेलणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. अमोल कीर्तीकर यांनी कुठलीच निवडणूक लढली नसली, तरी उत्तम रणनीतीकार अशी त्यांची ओळख आहे. वडील खासदार असल्याने निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी असून उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात त्यांनी आपला चांगलाच जनसंपर्क वाढवला आहे. मतदार संघातील अनेक गोष्टींची जाण करून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न ते करीत होते.

या लोकसभा मतदार संघात अंधेरी पश्चिममधून आमदार अमित साटम, वर्सोवा येथे आमदार डॉ. भारती लव्हेकर, गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर हे भाजपचे तीन आमदार असून, स्वतः शिंदे सेनेचे आमदार रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. तर दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वच्या आमदार ऋतुजा लटके हे उद्धव सेनेचे दोन आमदार असे या मतदार संघाचे बलाबल आहे.

चौकशी असलेल्यांमध्ये लढत

वायकर व कीर्तीकर हे दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे गेले आहेत. जोगेश्वरीतील राखीव भूखंडावर हॉटेलच्या बांधकामाप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर वायकर यांची अलीकडेच ‘ईडी’ने सखोल चौकशी केली होती. या प्रकरणात त्यांच्या पत्नीच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. तसेच वायकर यांच्यावर अलिबाग येथील कथित 19 बंगल्यांच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. यामध्ये उद्धव ठाकरेंचेही नाव जोडले गेले होते. याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, ‘ईडी’ चौकशीत अटकेच्या भीतीने वायकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांना आता लोकसभेची उमेदवारीही मिळाली आहे. अमोल कीर्तीकर यांच्यावरही कोरोना काळातील खिचडी वाटपात घोटाळ्याचा आरोप आहे. कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांना ‘ईडी’ने चौकशीला बोलावले होते. त्यांची अजूनही चौकशी सुरूच आहे.

Back to top button