पुण्यातील औंध रुग्णालयात औषधांचा तुटवडा | पुढारी

पुण्यातील औंध रुग्णालयात औषधांचा तुटवडा

पिंपळे गुरव(पूणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून औंध रुग्णालयात मधुमेह व अन्य आजारांवरील औषधे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना आर्थिक फटका बसत असून, त्यांना बाहेरुन औषधे आणावी लागताहेत. त्यामुळे रुग्णांनी लवकरात लवकर औषधे उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

रुग्णांना आर्थिक फटका

उपनगरातील मधुमेह आणि बीपी आजाराचे रुग्ण पुणे जिल्हा औंध शासकीय रुग्णालया दर महिन्याला तपासणी आणि विनामूल्य औषधे घेण्यासाठी जातात. मध्यवर्ती असलेल्या या रुग्णालयात मोठ्या संख्येने विशेषत: गरीब कुटुंबीयांतील रुग्ण येत असतात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पुणे-औंध रुग्णालयात मधुमेह व अन्य आजारांवरील औषधे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे.

रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष

तपासणी झालेल्या रुग्णांना औषध विभागातील कर्मचार्‍यांकडून बाहेरून गोळ्या विकत घ्या, असा सल्ला दिला जातो. अनेक वेळा रुग्णाची आर्थिक परिस्थिती फारसी चांगली नसल्यामुळे रुग्ण गोळ्या घेण्यास टाळाटाळ करतात. मागील काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली होती. तसेच, औषधे मिळण्याबाबत अधिकार्‍यांची कानउघाडणी केली होती. परंतु, त्यानंतर परिस्थिती जैसे थे आहे. सुसज्ज औंध रुग्णालयाचा विस्तार येत्या काळात होईल. परंतु, गरजेच्या औषधांच्या तुटवड्याकडे प्रशासन लक्ष देणार का? हे पाहणे गरजेचे आहे.

औषध विभागातील लिस्टमध्ये असलेली औषध मिळतात. सध्या औषधांचा पुरवठा नाही. त्यामुळे रुग्णाला पर्यायी गोळ्या दिल्या जातात.

– डॉ. वर्षा डोईफोडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, औंध रुग्णालय

औंध शासकीय रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून मधुमेह आजारावरील औषधे मिळत नाहीत. यासाठी दर महिन्याला हेलपाटे मारावे लागतात. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या मिळतात, तर काही मिळत नाहीत. त्यामुळे बाहेरील मेडिकलमधून औषधे आणावी लागतात.

– ललिता परिमल, रुग्ण, सांगवी

हेही वाचा

Monsoon Forecast : मान्सून विदर्भातून राज्यात सक्रिय; बंगालच्या उपसागरातून दुसऱ्या शाखेची एन्ट्री

सोलापूर-पुणे महामार्गावर बाळे येथे वाहनांच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू; शिवसेनेचा रास्ता रोको

पिंपरी : वल्लभनगर बसस्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य 

Back to top button