पालिकेच्या दारातच होर्डिंग; फलकासाठी झाडाच्या तोडल्या फांद्या | पुढारी

पालिकेच्या दारातच होर्डिंग; फलकासाठी झाडाच्या तोडल्या फांद्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यात धोकादायक व अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा तापलेला असताना महापालिकेच्या नवीन इमारतीच्या दारातच होर्डिंग उभारण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे हे होर्डिंग पीएमपीएमएल बसस्थानकाच्या व नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्या तोडून उभारण्यात येत आहे.  पुण्यात व पिंपरी-चिंचवड परिसरात होर्डिंग कोसळून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याने होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून शहरातील अधिकृत, पण धोकादायक व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ नवीन होर्डिंग उभारले जात आहे. नागरिकांची ये-जा असलेल्या ठिकाणी होर्डिंग नसावे, असा नियम असताना महापालिकेने चक्क पीएमपीएमएल बसस्थानकाच्या परिसरातच होर्डिंग उभारण्यास परवानगी दिली आहे.
या होर्डिंगसाठी महापालिकेने येथील चिंचेच्या झाडाच्या फांद्या छाटण्यास परवानगी दिली असून, प्रत्यक्षात मोठ्या फांद्या कापण्यात आल्या आहेत. या ठिकाणी होर्डिंग उभारण्यात येणार असल्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली. आता या ठिकाणी 400 चौरस फुटांचे होर्डिंग लावण्यात येणार आहे. यासाठी भर रस्त्यामध्ये भला मोठा गर्डर उभारण्यात आला आहे. बसस्थानकाशेजारीच महापलिका प्रशासनाने कोणताही विचार न करता रस्त्यावर होर्डिंग उभारण्याचे काम सुरू केले आहे.  महापालिका आयुक्तांनी, झाड तोडून होर्डिंग उभारले असल्यास असे होर्डिंग काढून टाका, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
असे असताना पालिकेच्या समोरच राजरोजसपणे हा प्रकार सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी नियमात नसतानासुद्धा अशा प्रकारे होर्डिंगला परवानगी देत असल्यामुळे होर्डिंगच्या शहरातील परवानगीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  त्यामुळे आता अशाप्रकारे रस्त्यावर उभारण्यात येणारे होर्डिंग महापालिका काढणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाला याबाबत विचारले असता, माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर देण्यात आले. या ठिकाणी असलेले पीएमपीचे बसस्थानक शिवाजीनगर या ठिकाणी हालवण्यात येणार होते. अद्यापही कारवाई झालेली नाही. मेट्रो स्थानकाचा सरकता जिना महापालिकेच्या दारात आला आहे. आता महापालिकेच्या दारातच होर्डिंग उभारण्यात  येत आहे.

हेही वाचा

Back to top button