

पिंपळनेर,(जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा: साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या जोरदार वादळी पावसासह काही भागात किरकोळ गारपीट झाली. वादळामुळे कांदा चाळीसह दहा ते पंधरा घरावरील पत्रे उडाली. पावसामुळे कांदे ओले झाले. तसेच भाजीपाल्याच्या शेतीला फटका बसला.
पिंपळनेरसह परिसरात दुपारी ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर अचानक वादळासह जोरदार पाऊस सुरू झाला. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील वार्सा, कुडाशी, शेवगे, बल्हाणे येथे जोरदार पाऊस व वादळामुळे घरासह कांदा चाळीवरचे पत्रे उडाली. त्यामुळे साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले. काही भागात गारपीट झाल्याने भाजीपाल्याच्या शेतीला फटका बसला. डांगशिरवाडे येथे आठ ते दहा घरांचे,तसेच बोपखेल येथे सहा ते सात घरांचे,वार्सा येथे पाच ते सहा घरावरचे पत्रे उडाली. घटनेनंतर पिंपळनेरचे अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले.
या विषयी मंडळ अधिकारी विजय जगदाळे यांनी सांगितले की,पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील. वाऱ्याचा वेग 40 किमी प्रती तास असल्याने गुरुवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
पिंपळनेरसह परिसरात वादळामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत.त्यामुळे दुपारी साडे तीन वाजेपासून परिसरातील वीजपुरवठा खंडीत आला आहे.पिंपळनेर शहरातही वीजपुरवठा खंडीत झाला आहे.रात्री आठ वाजेपर्यंत परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.वादळामुळे अनेक झाडे देखील उन्मळून पडली आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत.त्या ओढून पुन्हा वीज पुरवठा सुरु करण्यासाठी वेळ जाऊ शकतो,काही भागात रात्री वीज पुरवठा सुरु होईल.मात्र ज्या परिसरात जास्त नुकसान झाले आहे.नुकसान त्या भागात शुक्रवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल,असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची सांगितले.
हेही वाचा-