जागतिक योग दिन : आधुनिक जीवनशैलीने येणार्‍या व्याधींवर रामबाण उपाय

जागतिक योग दिन : आधुनिक जीवनशैलीने येणार्‍या व्याधींवर रामबाण उपाय
Published on
Updated on

अनेक तास बैठे काम… सतत संगणकावर खिळलेले डोळे अन् की-पॅडवर फिरणारी बोटे… मोबाईलच्या अतिवापराने सातत्याने खाली घातलेली मान… प्रचंड वाढलेली व्यावसायिक स्पर्धा आणि त्यातून वाढलेला जबरदस्त मानसिक-बौद्धिक ताण…
जंक फूड तसेच व्यायामाचा अभाव… या आधुनिक जीवनशैलीने माणसाचे शरीर-मन व्याधिग्रस्त बनले आहे. यातून त्याला बाहेर काढून निरोगी-सशक्त-सळसळत्या उत्साहाने न्हाऊन कोण काढू शकेल? …तर भारतातील प्राचीन काळातील पतंजलींनी सांगितलेली योगसाधना. आधुनिक समस्यांना उत्तर केवळ योगच देऊ शकेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेल्या योगगुरूंनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
दै. 'पुढारी'ने या योगगुरूंशी संवाद साधला असता त्यांनी आधुनिक काळातील समस्यांबाबत सविस्तर विवेचन केले तसेच शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांच्या व्याधींसाठी कोणती आसने उपयुक्त ठरतील, याचे मार्गदर्शनही केले. आजच्या काळातील सतत आणि कायम असणारी स्पर्धा आणि ताण हा मनाच्या एकाग्रतेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आयुष्यात अशी काही आव्हाने किंवा आश्चर्ये येतात की, मन एकाग्र करणे खूपच आव्हानात्मक बनते. अशा वेळी केवळ योगच शरीर आणि मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे मत योगगुरू मांडतात.

योग प्रशिक्षक मनोज पटवर्धन म्हणाले, 'ध्यानधारणा करण्याचा नियमित सराव केल्याने लक्ष वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते. ध्यान आपल्याला वर्तमानकाळात राहण्यास अधिक सक्षम करते. योगासनांच्या अभ्यासामुळे मेंदू कार्यरत होऊन मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते. म्हणूनच, मन एकाग्र करण्यासाठी योगाभ्यास हा एक नैसर्गिक मार्ग आहे. योगामुळे लोकांना चिंताग्रस्त भावनांवर मात करण्यास मदत होते आणि त्यांच्या कामावर आणि उपलब्धींवर लक्ष केंद्रित होण्यास मदत होते, असे आढळून आले आहे. योगवर्गात सहभागी झालेल्या आणि विशिष्ट आसने केलेल्या लोकांमध्ये सकारात्मक भावना आणि एकाग्रता निर्माण झाल्याचे समोर आले आहे.'
आधुनिक जीवनशैलीने माणसाचे शरीर आणि मन दुर्बल होते आहे. कार्यालयात दिवसाचे अनेक तास सलग बसावे लागते तसेच संगणकावर प्रदीर्घ काळ काम करावे लागते. एकाच ठिकाणी बसून राहिल्याने पाठीच्या मणक्यावर अवाजवी ताण येतो.

तसेच संगणकाच्या की-पॅडवर हात ठेवून बोटे फिरवत राहिल्याने मनगट, बोटे यांच्या हालचालीही सीमित होतात. त्याचप्रमाणे मोबाईलचा कारणपरत्वे किंवा अकारण बरेच तास वापर करीत राहिल्याने मानेचे स्नायू आखडतात तसेच डोळ्यांवरही ताण येतो. मणक्यांचा किंवा मानेचा स्पाँडिलिसिस तसेच अन्य स्नायूविकार बळावल्याच्या सार्वत्रिक तक्रारी यामुळेच येत आहेत. यातून आधुनिक माणसाची सुटका करण्यासाठी योगोपचार उपयोगी ठरतो, असा अनुभव योगगुरू सांगतात. त्यामुळे विविध स्नायू बळकट होतातच; पण प्राणायामामुळे मनाची एकाग्रता साधली जाते, असेही त्यांचे निरीक्षण आहे.

हॅमॉक योग ठरतोय प्रभावी
योगासने-हॅमॉक हा नवीन प्रकार खूप प्रचलित होताना दिसतो आहे. यामध्ये एका मोठ्या कापडाला झोळीप्रमाणे बांधून त्यामध्ये आसने केली जात आहेत. त्याचा परिणामही चांगला दिसून आल्याचे आंतरराष्ट्रीय योगपटू मनाली देव यांनी सांगितले.

योग हे आपलेच शास्त्र आहे. पण, त्याच्या नवीन प्रकारांना शिकून घेणे हेसुध्दा आवश्यक आहे. योगाभ्यासामध्ये आसन, प्राणायाम, ध्यान हे आहेच; पण यम, नियम, प्रत्याहार, धारणासुध्दा अंगीकारले पाहिजे. नियमित योगाभ्यासाने रक्तप्रवाह सुरळीत होतो. शारीरिक व मानसिक समस्या कमी होतात. वाताचा प्रकार, शारीरिक दुखणे कमी होत असल्याने सर्वसामान्यांसह सर्वांच्या आयुष्यात योग आवश्यक आहे.
                                          – मनाली देव, आंतरराष्ट्रीय योगपटू व प्रशिक्षक

अनेक वेळा अत्याधुनिक सुखसोईसुध्दा दु:खदायी ठरत असल्याचे आढळून आले आहे. इतर व्यायामप्रकारांत केवळ शरीर दणकट होऊ शकते. परंतु, मन आणि मेंदू यांचा प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी योगासनातील विविध आसनांमध्ये मन आणि मेंदू हलका करण्याची ताकद अधिक आहे. शरीर आणि मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी योग महत्त्वाचा ठरत असून, मन निर्विकार ठेवण्यासाठी योग आवश्यक आहे.
                                                   – मनोज पटवर्धन, योग प्रशिक्षक

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news