गोंदिया: ८ हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात | पुढारी

गोंदिया: ८ हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद न करण्याकरिता १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला तडजोडी अंती ८ हजार रुपयाची लाच स्वीकारताना गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि. २६) रंगेहाथ पकडले. अनिल फागुजी पारधी (वय ५४, रा. श्रीनगर, गोंदिया) असे लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे ट्रॅक्टर चालक असून त्यांच्या विरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार करण्यात आली होती. दरम्यान गुन्हा दाखल न करण्याकरीता व तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यात समझोता करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, त्यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी २४ मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दाखल केली. यावर पडताळणीदरम्यान आरोपी अनिल पारधी याने १० हजार रुपये लाच रकमेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

दरम्यान, सापळा कारवाई केली असता त्यास पंचा समक्ष ८ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम, संजय पुरंदरे, गोंदियाचे पोलीस उप अधीक्षक पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अतुल तवाड़े, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलिस हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे, काटकर, रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांनी केली.

महिनाभरातील तिसरी कारवाई

जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची महिनाभरातील ही तिसरी कारवाई आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच महिन्याच्या सुरुवातीलाच ७ मे रोजी गोरेगाव येथील तहसीलदार, नायब तहसीलदारासह एका खाजगी व्यक्तीला लाच घेताना पकडण्यात आले होते. तर १४ मे रोजी जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवकांसह ६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
हेही वाचा 
 

Back to top button