तासगाव: पुढारी वृत्तसेवा : सावळज, सिद्धेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले आहे. शेतकरी गुन्हेगार नाहीत. पाण्यासाठी आंदोलन केल्यावर गुन्हे दाखल होत असतील, तर यापुढे कोणीच पाण्यासाठी आंदोलन करणार नाही. जर शेतकऱ्यांवर आंदोलन केले म्हणून गुन्हे दाखल करणार असाल, तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांबरोबर मलाही तुरुंगात टाका, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी घेतली. जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही, असे सांगत पाटील यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिनमध्ये सुमारे तीन तास ठिय्या मारला.
शनिवारी विसापूर योजनेचे पाणी सावळज भागात सोडण्यात आले होते. मात्र, काही तासांतच हे पाणी बंद करण्यात आले. एका नेत्याच्या सांगण्यावरून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी बंद करण्याचे पाप केले आहे, असा आरोप करून शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर आज (दि.२६) रास्ता रोको केला. सुमारे दोन तासांहून अधिक काळ हा रस्ता रोको चालला. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत गेली. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून अनेक आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. या आंदोलकांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
पोलिसांची ही दडपशाही कानावर येतात रोहित पाटील यांनी तातडीने तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. या ठिकाणी पाटील यांनी आंदोलन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिनमध्ये रोहित पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला.
'शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले आहे. सावळज भागात पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्यासही पाणी नाही. पाटबंधारे विभागाकडे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अनेक निवेदने दिली आहेत. मात्र, या विभागाकडून वंचित गावांना पाणी देण्याचे नियोजन केले जात नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे.
दरम्यान, सामान्य लोकांना रास्ता रोकोमुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे. या रास्ता रोकोची माहिती वरिष्ठांपर्यंत गेली आहे. त्यामुळे माझा नाईलाज आहे. मला आंदोलकांवरती गुन्हे दाखल करावेच लागतील, अशी भूमिका पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घेतली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, शहराध्यक्ष अॅड. गजानन खुजट, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा