सातारा : ऐन पावसाळ्यात ५५ गावे तहानलेली | पुढारी

सातारा : ऐन पावसाळ्यात ५५ गावे तहानलेली

सातारा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या दिवसात माण, खटाव, कोरेगाव, वाईसह अन्य तालुक्यातील सुमारे 55 गावे व 227 वाड्यांमध्ये पाण्याची ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या वाढू लागली आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

पावसाळ्याच्या दिवसातही जिल्ह्यात कडक उन्हाळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उन्हामुळे भूजल पातळीत घट निर्माण झाली असल्याने पाण्याचे स्त्रोतही कोरडे पडू लागले आहेत. नदी, नाले, ओढे, विहिरी, तलाव व धरणांची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून जिल्ह्यातील काही गावात व वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील माण तालुक्यातील 33 गावे व 208 वाड्यामधील 51 हजार 727 नागरिक व 3 हजार 940 जनावरांना 24 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातील जायगाव, मांजरवाडी गावातील 1 हजार 968 नागरिक व 204 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातील सासवडमधील 750 नागरिक व 545 जनावरांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यातील एका गावातील 185 नागरिक व 158 जनावरांना एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाई तालुक्यातील 5 गावे व 6 वाड्यांमधील 5 हजार 320 नागरिक व 3 हजार 51 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यातील एका वाडीमधील 540 नागरिक व 130 जनावरांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जावली तालुक्यातील 2 गावे एका वाडीमधील 2 हजार 73 नागरिक व 574 जनावरांना 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील 6 गावे व एका वाडीमधील 2 हजार 245 नागरिक व 522 जनावरांना 4 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सातारा तालुक्यातील 1 गाव 3 वाड्यांमधील 624 नागरिक 85 जनावरांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. कराड तालुक्यातील 5 गावांमधील 3 हजार 507 नागरिक व 2 हजार 385 जनावरांना 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे

जिल्ह्यातील माण 24, खटाव 2, फलटण 1, कोरेगाव 1, वाई 2, पाटण 1, जावली 2, महाबळेश्वर 4, सातारा 1 व कराड 3 असे मिळून टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमधील नागरिक व जनावरांना 41 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यास आणखी टँकर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button