पुणे : थाटात निघाली ‘समृद्ध शिक्षणाची रॅली’ | पुढारी

पुणे : थाटात निघाली ‘समृद्ध शिक्षणाची रॅली’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ‘समृद्ध शिक्षणाची रॅली’ काढण्यात आली. या रॅलीला केंद्रीय शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजयकुमार यांनी हिरवा झेंडा दाखविला. या वेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी आदी उपस्थित होते. केंद्रीय शिक्षण सचिव कुमार म्हणाले, ‘जी-20 शिक्षण कार्यगटाच्या पुणे येथे आयोजित चौथ्या बैठकीनिमित्त ’मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या मूलभूत विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात येत आहे.

चांगले शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीच्या बळावर आज युवावर्ग मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यास तयार आहे.’ शिक्षण आयुक्त मांढरे म्हणाले, ‘जी-20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीत विविध देशाचे सुमारे 20 देशापेक्षा जास्त देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याअनुषंगाने घेण्यात येणार्‍या उपक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे आणि अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीला शनिवारवाडा येथून सुरुवात करण्यात आली. लालमहाल चौक – क्रांती चौक – तांबडी जोगेश्वरी मंदिर- अप्पा बळवंत चौक – प्रभात टॉकीज- फुटका बुरुजमार्गे पुणे मनपा भवन येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये विविध विद्यालयांचे पारंपरिक वेषभूषा परिधान केलेले विद्यार्थी, एनसीसी, स्कॉउट, गाईड पथक आदी सहभागी झाले होते.

हे ही वाचा : 

World Yoga Day : राज्यातील २ हजार ६५५ अमृत सरोवरस्थळी जागतिक योग दिवस 

Sikandar Raza : सिकंदर रझाची झंझावाती खेळी

Back to top button