बुलाती है मगर..: खोट्या लग्नाने ३ लाखांचा गंडा; ४ महिलांसह टोळी अटकेत | पुढारी

बुलाती है मगर..: खोट्या लग्नाने ३ लाखांचा गंडा; ४ महिलांसह टोळी अटकेत

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा: खोटा विवाह लावून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश केला.  देगाव (वा) येथील कुटुंबाची ३ लाख २१ हजारांची फसवणूक या टोळीने केली होती. या टोळीने खोटा विवाह लावून अनेकांना फसविल्याचा संशय असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

  • देगाव (वा)  (ता. मोहोळ) येथील तरुणासोबत  खोटा विवाह लावून आर्थिक फसवणूक
  • देगाव (वा) येथील कुटुंबाची ३ लाख २१ हजारांची फसवणूक
  • सहा जणांच्या टोळीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देगाव (वा)  (ता. मोहोळ) येथील नितीन विष्णू भोसले (वय 25) हे मुंबई येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. वडील शेती तर भाऊ महावितरणमध्ये नोकरी करतो. दरम्यान, नितीन याचा थोरला भाऊ सचिन (वय 30) याच्या विवाहासाठी मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. मात्र, विवाह जुळून येत नव्हता. दरम्यान, नितीन याने त्याच्या मावस भावाला सचिनसाठी मुलगी बघ, असे सांगितले होते. मावस भावाने विवाह जुळविणारा एजंट गंगाधर लाडबा ढेरे (रा. कोळेगाव बुद्रुक, ता भोकर, नांदेड) याचा नंबर नितीनला दिला. दिलेल्या नंबरवर नितीनने संपर्क साधला असता मुलगी आहे, परंतु विवाह जमला तर रोख रक्कम अडीच लाख व गाडी भाड्यासाठी अकरा हजार रुपये रोख असे एकूण 2 लाख 61 हजार रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली. ती अट मान्य झाल्यावर मुलीकडच्या मंडळींनी व्हॉट्सअॅप वर मुलीचे फोटो पाठविले. घरातील सर्वांना ती मुलगी पसंत पडल्यावर नितीनच्या  कुटुंबीयांनी रक्कम देण्याची तयार दाखविली.

भोसले कुटुंबियाच्या घरी घरगुती पद्धतीने विवाह सोहळा

दरम्यान 2 एप्रिल रोजी मुलगी व अन्य 5 जण असे एकूण 6 जण दुपारी दोन वाजता चारचाकी गाडीतून देगाव येथे आले. घरी आल्यावर सर्वांची संयुक्त बैठक झाली. ठरल्या प्रमाणे रोख रक्कम देण्याचे व त्याच दिवशी विवाह करण्याचे ठरले. त्या प्रमाणे नितीनच्या फोन पे वरून वेगवेगळ्या रकमेसह 5 वेळा 1 लाख 30 हजार रुपये पाठवून दिले. त्याच वेळी सचिन याने ही चार वेळा वेगवेगळी रक्कम पाठवली एकूण 2 लाख 41 हजार रुपये मुलीच्या नातेवाईकांना पोहोचले.  पैसे मिळाल्यावर त्याच दिवशी 2 एप्रिलरोजी सायंकाळी साडेसहा वाजता भोसले कुटुंबियाच्या घरी घरगुती पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. आलेले नातेवाईक मुलीला सोडून गेले.

घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जाण्याच्या बहाण्याने मुलगी पसार

दरम्यान 10 एप्रिलरोजी मुलीचा भाऊजी शैलेश याचा फोन आला की, घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तुम्ही मुलीला घेऊन या व कार्यक्रम संपल्यावर परत घेऊन जा. त्या प्रमाणे वडील व मुलगी 13 एप्रिलरोजी रात्री खासगी लक्झरीने गेले. ते 14रोजी  सकाळी साडेसात वाजता नागपूर हायवे वर उतरले. त्यावेळी शैलेश हा त्या ठिकाणी आला होता. त्याने रिक्षा करून मुलगी व विष्णू भोसले यांना अकोला बस स्थानकावर घेऊन गेला. विवाहित मुलगी लघुशंकेचे निमित्त करून गेली ती परत आलीच नाही. तर शैलेश याने आपल्याला घरी जाण्यासाठी गाडी येणार आहे. ती आली का म्हणून बघून येतो, म्हणून गेला. तो ही गायब झाला. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर विष्णु भोसले यांना दोघे ही मिळून आले नाहीत.

त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे विष्णू भोसले यांच्या लक्षात

त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे विष्णू भोसले यांच्या लक्षात आले. घरातून जाताना मुलीने अंगावर सोन्याचे दागिने, फुले, झुबे, मंगळसूत्र चांदीचे पैंजण व जोडवी असा एकूण 53 हजारांचा ऐवज व घरातील रोख 27 हजार रुपये घेऊन गेली. दरम्यान 25 मेरोजी नितीन भोसले व कुटुंबीयांना समजले की, आपली फसवणूक केलेल्या महिला पेनुर (ता. मोहोळ) येथील एका मंगल कार्यालयात कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील प्रथमेश भोसले यांचा फसवून विवाह करण्यासाठी येणार आहेत. खातर जमा करण्यासाठी नितीन भोसले व कुटुंबीय पेनुर येथील मंगल कार्यालयात गेले. त्या ठिकाणी फसवणूक केलेल्या महिला त्यांना दिसून आल्या. नितीन भोसले कुटुंबीयांनी तातडीने मोहोळ पोलीस ठाण्याची संपर्क करून वरील हकीकत सांगितली.

दरम्यान पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत आदलिंगे व अन्य पोलीस पथकसोबत भोसले कुटुंबीय पेनुरला मंगल कार्यालयात आले असता, नवीन होणारी नवरी व अन्य तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी खोटा विवाह लावून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 21 हजाराची फसवणूक केल्या प्रकरणी नितीन भोसले (रा. देगाव (वा) यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

या प्रकरणातील चार महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघे जण फरार आहेत. अटक केलेल्या चौघींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा तपास हवालदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button