ओडिसा दुर्घटनेनंतर पुणे रेल्वे नियंत्रण कक्ष सतर्क; 35 कर्मचार्‍यांचे जागते रहो… | पुढारी

ओडिसा दुर्घटनेनंतर पुणे रेल्वे नियंत्रण कक्ष सतर्क; 35 कर्मचार्‍यांचे जागते रहो...

प्रसाद जगताप

पुणे : ओडिशात घडलेल्या भयंकर रेल्वे अपघातानंतर रेल्वेच्या पुणे विभागाचा नियंत्रण कक्ष सतर्क झाला असून, चोवीस तास जागते रहो म्हणत सुमारे 200 गाड्यांचे डोळ्यांत तेल घालून ऑपरेटिंग करीत आहेत. स्थानक व्यवस्थापनाकडून छोटी जरी चूक झाली तरी नियंत्रण कक्षाच्या मुळावर येऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी काम करणारे कर्मचारी 24 तास सतर्क असतात. ओडिशात घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर दै.’ पुढारी’च्या प्रतिनिधीने नियंत्रण कक्षाची पाहणी केली, तेव्हा हे चित्र दिसले.

पुणे विभागात 9 नियंत्रण कक्षांद्वारे दररोज सुमारे 200 रेल्वे गाड्यांच्या नियंत्रणाचे काम होते. संगणकावर दिसतात ते फक्त गुंतागुंतीचे रेल्वेलाइनचे जाळे, यात समोरील माइकवरून क्षणा-क्षणाला विभागातील 65 स्टेशनच्या मास्तरांकडून सूचना येत असतात. या सर्वांची माहिती चीफ कंट्रोलर सीओजी योगेंद्र चौहान यांनी प्रतिनिधीला दिली.

सहा तास डोळ्यांत तेल घालून

नियंत्रण कक्ष समन्वय साधतो, संवाद साधतो, अखंडपणे प्रतिसाद देतो तसेच ट्रेनच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. रेल्वेची हालचाल 24 बाय 7 सुरळीत करण्याचे आव्हान असते. यासाठी नियंत्रण कक्षामध्ये 100 कर्मचार्‍यांची टीम असते. रेल्वेचे दळणवळण पाहणारी 35 जणांची टीम असते तर बाकीचे सिग्नलिंग, विद्युतीकरण, ट्रॅक (रेल्वेरुळ) सिस्टिम, डबे नियंत्रण, इलेक्ट्रिकल, इंजिन, सुरक्षा, तिकीट बुकिंग, लोडिंग अनलोडिंगच्या नियंत्रण कक्षासाठी काम पाहतात. या वेळी प्रत्येकाला सहा तासांच्या शिफ्टमध्ये डोळ्यांत तेल घालून काम करावे लागते.

या आहेत 9 कंट्रोल रूम…

ऑपरेटिंग (सर्वांत महत्त्वाचा नियंत्रण कक्ष)
ओएचई (रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण)
एसएनटी (सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन)
इंजिनिअर (रेल्वे ट्रॅक सिस्टिम)
सीएनडब्ल्यू (कॅरेज अँड वॅगन, कोच सिस्टिम)
ईटीएल (इलेक्ट्रिकल ट्रेन लायटिंग)
लोको (ट्रेन पॉवर कंट्रोल-डिझेल, इलेक्ट्रिक इंजिन)
आरपीएफ (सुरक्षाव्यवस्था)
कमर्शिअल (तिकीट बुकिंग, लोडिंग, अनलोडिंग)

…आणि तेथे रेल्वे थांबली

बुधवारी या नियंत्रण कक्षाची पाहणी सुरू असतानाच
अचानक हडपसर स्टेशन मास्तरकडून ऑपरेटरला कॉल आला. हडपसर येथील लूप लाइनजवळील ओव्हरहेड केबलवर पिंपळाचे झाड पडले आहे. त्यामुळे एका रेल्वेगाडीला ब्लॉक हवा होता. त्या वेळी येथील अधिकार्‍यांनी येथील परिस्थिती हाताळत तत्काळ त्या गाडीला ब्लॉक दिला आणि इतर गाड्यांना मार्ग मोकळा करून दिला. हा मॅसेज लवकर आल्याने ती गाडी थांबविता आली.

लाइव्ह स्क्रीनवर अशी होते गाड्यांची ओळख…

ऑपरेटरसमोर गाड्यांच्या हालचाली दर्शविणारी एक लाइव्ह स्क्रीन असते. यावर रंगीत लाइनच्या माध्यमातून रेल्वे गाड्या धावताना दिसतात. रेड लाइन म्हणजे मेल एक्स्प्रेस, ब्लू लाइन म्हणजे लोकल गाड्या, ग्रीन लाइन म्हणजे मालगाडी, तर पिंक लाइन म्हणजे विशेष गाडी असते. त्यांना मार्ग देणे, त्यांना वेळेत निश्चित थांब्यावर पोहचविण्याचे काम ट्राफिक नियंत्रण कक्षाद्वारे चालते. एखादी समस्या आल्यास त्या त्या नियंत्रण कक्षाला माहिती देऊन उपाययोजना केल्या जातात.

तब्बल 9 नियंत्रण कक्षांद्वारे पुणे रेल्वे विभागाचे काम चालते. हे कक्ष रेल्वेचा ब्रेन म्हणून काम करतात. त्या कक्षांचे काम रेल्वे पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या नेतृत्वाखाली चालते. आम्हाला डोळ्यांत तेल घालून हे काम करावे लागते. कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी आम्ही सज्ज असतो.

– डॉ. स्वप्निल नीला,
वरिष्ठ विभागीय परिचालन प्रबंधक, रेल्वे पुणे विभाग

हेही वाचा

पुणे : ‘आयटी’ कंपनीला पायघड्या? मंत्र्यांच्या दबावामुळे पालिका अधिकार्‍यांच्या ‘जोर-बैठका’

World Oceans Day : सागरी प्रदूषण जलचरांकरिताच नव्हे मानवासाठीही घातक

WTC Final 2023 : हेडच्या शतकामुळे ‘हेडेक’; स्मिथही शतकाच्या उंबरठ्यावर : ऑस्ट्रेलिया ३ बाद ३२७ धावा

Back to top button