

लंडन; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 3 विकेटस् केवळ 76 धावांत मिळाल्याने उत्साहित झालेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांची दमदार कामगिरी भारतासाठी चांगलीच हेडेक झाली. ट्रॅव्हिस हेडने भारताविरुद्धचे पहिले शतक ठोकले. तो 146 धावांवर नाबाद असून स्टीव्ह स्मिथही शतकाच्या उंबरठ्यावर आहे. 95 धावांवर खेळणार्या स्मिथला 31 व्या शतकासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. (WTC Final 2023)
या दोघांनी उपहारानंतर दिवसाची 61 षटके निर्धोकपणे खेळून काढत नाबाद 251 धावांची भागीदारी केली. यांच्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिला दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 3 बाद 327 धावा केल्या. 3 बाद 76 वरून 3 बाद 170 अशी मजल ऑस्ट्रेलियासाठी सुखावणारी आहे. (WTC Final 2023)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसर्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूच्या जोडीने मैदानात उतरला.(WTC Final 2023)
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय वेगवान गोलंदाजांनी सार्थ ठरवत पहिल्या 15 चेंडूंत कांगारूंना एकही धाव घेऊ दिली नाही. मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात सलामीवीर उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद करत कांगारूंना पहिला धक्का दिला. ख्वाजाने भारतात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत चांगली फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना सतावले होते. मात्र सिराजने त्याला शून्यावर बाद केले. त्यानंतर वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ऑस्ट्रेलियासाठी महत्वपूर्ण असलेला पहिला तास खेळून काढळा. दोघांनी दुसर्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवणार असे दिसत असतानाच शार्दूल ठाकूरने भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने 43 धावा ठोकणार्या डेव्हिड वॉर्नरला बाद केले. उपहारासाठी खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 73 धावा झाल्या होत्या.
लंचनंतर मोहम्मद शमीने मार्नस लॅबुशेनचा त्रिफळा उडवत कांगारूंना मोठा धक्का दिला. लॅबुशेनने 26 धावा केल्या. मात्र, या धक्क्यातून स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेडने संघाला सावरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. हेडने आक्रमक फलंदाजी केली तर स्मिथ त्याला एका बाजूने साथ देत होता. या दोघांनी संघाला दीडशतकी मजल मारून दिली. हेडने बचावापेक्षा आक्रमणावर भर देत 60 चेंडूंत अर्धशतक गाठले.
त्यानंतर तीच लय कायम ठेवत त्याने प्रत्येक गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. त्याने 106 चेंडूंत शतक झळकावले. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये शतक ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याला साथ देताना स्टीव्ह स्मिथने 145 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दोघांनीही फटकेबाजी सुरूच ठेवली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, ट्रेव्हिस हेड 156 चेंडूंत 22 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 146 धावांवर आणि स्टीव्ह स्मिथ 227 चेंडूंत 14 चौकारांसह नाबाद 95 धावांवर खेळत आहे.
ओडिशातील रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या लोकांना आदरांजली वाहण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांतील खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधल्या. भारताच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघातांपैकी एकामध्ये तीन ट्रेनची टक्कर झाल्यामुळे जवळपास 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
हेही वाचा;