World Oceans Day : सागरी प्रदूषण जलचरांकरिताच नव्हे मानवासाठीही घातक | पुढारी

World Oceans Day : सागरी प्रदूषण जलचरांकरिताच नव्हे मानवासाठीही घातक

अलिबाग; जयंत धुळप : महासागरात कुजणारे घटक प्रदूषणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांची कुजण्याची प्रक्रिया या महासागरांमध्ये होते. त्याकरिता सागराच्या पाण्यातील प्राणवायू वापरला जातो. या प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साईडची निर्मिती होते, अशी अत्यंत घातक प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. ती केवळ सागरी जलचरांकरिताच नव्हे तर मानवाला देखील घातक ठरत असल्याचा निष्कर्ष नुकताच एका संशोधनातून पुढे आला आहे. (World Oceans Day)

रत्नागिरी येथील शासकीय मत्स्य महाविद्यालयाच्या सागरी जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी हे संशोधन केले आहे. दरवर्षी 8 जून ‘जागतिक महासागर दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त या संशोधनाची माहिती घेतली. (World Oceans Day)

यंदाची महासागर दिनाची थिम ‘द ओशन : लाईफ अँड लाईव्हलीव्हिटीज’ अर्थात ‘महासागर : जीवन आणि उपजीविका’ अशी आहे. 2021 ते 2030 या दशकात शाश्वत विकासासाठी समुद्र विज्ञान विकासाशी संबंधित अशी थीम आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2008 मध्ये ठरवले आणि त्यानुसार 2009 या वर्षापासून जागतिक महासागर दिन साजरा केला जातो. (World Oceans Day)

डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी या संशोधनात सविस्तर मांडणी केली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, मानवी क्रियाकल्पांमुळे होणारी जीवसृष्टीची हानी कुठेतरी थांबली पाहिजे. पृथ्वीवर माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी समजला जातो. त्याचप्रमाणे निसर्गामध्ये ढवळाढवळ करणारादेखील माणूसच असतो. (World Oceans Day)

समुद्री जीवांचे अस्तित्व आज मानवाच्या वर्तनावर अवलंबून आहे. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर जगभरात वायू प्रदूषण, जलप्रदूषण, माती प्रदूषण, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले आहे. मोठे मोठे देश महासागरांमध्ये विविध घातक चाचण्या घेत आहेत. त्याचप्रमाणे क्षेपणास्त्रांच्या चाचण्या देखील महासागरांमध्येच होतात. एक प्रकारे महासागर हे मानवाच्या अति महत्त्वाकांक्षी क्रियाकल्पांमुळे धोक्यात आले आहेत.

महासागर आपल्याला प्राणवायू देतात महासागराकडून मानवाला प्रचंड प्रमाणात अन्न व इतर साधन संपत्ती उपलब्ध होते. परंतु गेल्या 25 ते 30 वर्षांत झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर समुद्र व महासागर यांचे प्रचंड प्रदूषण सुरू आहे. महासागरातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे. भारतासह जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था महासागरांवर अवलंबून आहेत. जगभरातील अनेक जलमार्ग व्यापारी आणि प्रवासाच्या द़ृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.

जागतिक महासागर दिनानिमित्त जनजागृती होणे जसे महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर शासनस्तरावरून सागरी प्रदूषण रोखण्याकरिता प्रभावी आणि प्रामाणिक उपाययोजना होणे तितकेच गरजेचे आहे. महासागरांचे महत्त्व मानवी आणि इतर जीवसृष्टीच्या द़ृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे हे यानिमित्त समोर येते.
डॉ. स्वप्नजा मोहिते, रत्नागिरी

अधिक वाचा :

Back to top button