हवामान बदलाचा चॉकलेटवरही परिणाम! | पुढारी

हवामान बदलाचा चॉकलेटवरही परिणाम!

वॉशिंग्टन : चॉकलेट बार खाणे कुणाला आवडत नाही? आबालवृद्धांच्या आवडीच्या या चॉकलेटवरही आता हवामान बदलाचा परिणाम होत आहे. जगभरात काही शतकांपासून चॉकलेटचे सेवन केले जाते, पण सध्या चॉकलेट चर्चेत आहे. कारण जगभरात चॉकलेटच्या किरमती वाढल्या आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये तर या किमतीत विक्रमी वाढ झाली. चॉकलेट बनवण्यासाठी वापरले जाणारे कोको एवढे महाग झाले आहे की, अमेरिकेत कोकोच्या प्रतिटन किमतीत दुपटीने वाढ झाली असून ती 5,874 डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. तेव्हापासून कोकोच्या किमतीत सतत वाढच होताना दिसते आहे.

चॉकलेट कोकोच्या फळांच्या बिया भाजून त्याच्या भुकटीपासून बनवले जाते. या कोकोच्या उत्पादनात घट झाल्याने किमती वाढल्याचे सांगितले जाते. जगभरात पुरवल्या जाणार्‍या कोको उत्पादनांपैकी बहुतांश उत्पादन अशा ज्या देशांत होतं, जिथे शेतकरी हवामान बदलाचे दुष्परिणाम झेलत आहेत. तिथल्या हवामानात झालेल्या बदलांचा कोकोच्या उत्पादनावर फारच वाईट परिणाम झाला आहे, पण या शेतकर्‍यांसमोर इतरही काही समस्या आहेत. पश्चिम आफ्रिका तसेच दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि ब्राझिलमध्ये कोकोचे उत्पादन होते. डॉक्टर केटी सॅमपेक इंग्लंडच्या रेडिंग विद्यापीठात पुरातत्त्व शास्त्राच्या प्राध्यापक आहेत आणि चॉकलेटच्या इतिहासावर संशोधन करत आहेत.

त्या सांगतात की, जवळपास चार हजार वर्षांपूर्वी उत्तर अमेझॉनिया म्हणजे आजच्या इक्वाडोर आणि व्हेनेझुएलाच्या भागात कोकोची झाडे सापडली होती. त्यानंतर या झाडांची लागवड मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत केली जाऊ लागली. त्यामुळे कोकोच्या झाडाच्या नव्या प्रजाती तयार करण्यात आल्या. संयुक्त राष्ट्रांच्या एका रिपोर्टनुसार कोकोचा व्यापार 20 अब्ज डॉलर्सचा आहे ज्यात कोको भाजून तयार केलेली पावडर आणि लिक्विडचाही समावेश आहे. कोकोच्या एकूण उत्पादनापैकी पन्नास टक्के कोको चॉकलेट उद्योगात वापरलं जातं. बाजारात चॉकलेट उद्योग 100 अब्ज डॉलर्सचा असून, 2026 पर्यंत हा आकडा 189 अब्जांवर जाईल असा अंदाज आहे. कोकोची विक्री आणि खरेदी आंतराष्ट्रीय कमॉडिटी मार्केटमध्ये होते आणि त्याची किंमत मागणी आणि पुरवठ्यानुसार कमी जास्त होते.

Back to top button