दिव्यांगांचा छळ केल्यास खबरदार…! | पुढारी

दिव्यांगांचा छळ केल्यास खबरदार...!

संतोष शिंदे :

पिंपरी : दिव्यांग फळ विक्रेत्याला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस आयुक्तांना दिव्यांग व्यक्तींच्या संरक्षणात्मक उपाय योजना करण्यासाठी तातडीचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे दिव्यांगांचा छळ होत असल्याचे तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच, दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर एका दिव्यांग फळ विक्रेत्याला तरुणाने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. यावर नेटकर्‍यांनी हळहळ व तीव— संताप व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस आयुक्तांना दिव्यांग व्यक्तींसाठी संरक्षणात्मक उपाय तसेच दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता दिव्यांग व्यक्तींचा छळ किंवा त्यांच्यावर हल्ला महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिव्यांग व्यक्तींना अमानवीय वागणूक व त्यांच्यावर जीवघेणे हल्ले केले जातात, अशा विविध तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. तसेच, दिव्यांग व्यक्तीचा गैरवापर करून त्यांची पिळवणूक केली जाते, अशा प्रकारच्या देखील तक्रारी प्राप्त होत आहेत.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 मधील कलम 6 व 7 मधील तरतूदीनुसार समुचित शासनाने दिव्यांग व्यक्तीच्या होणार्‍या विविध प्रकारच्या छळास प्रतिबंध करणे विषयक उपाययोजना कराव्यात, अशी तरतूद केलेली आहे. त्यानुसार, प्राधान्याने दिव्यांग व्यक्तीवर अन्याय होणार नाही, त्यांच्या छळ होणार नाही या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच, दिव्यांग व्यक्तीवर अन्याय होणार नाही, याबाबत योग्य दक्षता घेण्यात यावी, असे दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
अपंग व्यक्तीचा छळ केल्यास अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 चे कलम 92 नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. यामध्ये पाच वर्षांपर्यंत शिक्षा तसेच दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

उद्योगनगरीत दिव्यांग सुरक्षित
पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील चाकण पोलिस ठाणे वगळता इतर कोणत्याही पोलिस ठाण्यात दिव्यांगांना मारहाण झाल्याची नोंद नाही. सन 2022 मध्ये चाकणमध्ये अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार एकमेव गुन्हा चाकणमध्ये दाखल आहे. त्यामुळे उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात दिव्यांग सुरक्षित असल्याचे बोलले
जात आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून दिलेल्या सुचनांप्रमाणे दिव्यांग व्यक्तींवर होणारा अन्याय, अत्याचार, क्रूरता व पिळवणुकीच्या विरोधात प्रतिबंधात्मक / संरक्षणात्मक उपाययोजना सुरू आहेत. याबाबत सर्व परिमंडळीय पोलिस उपायुक्त, सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त तसेच, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना सूचित करण्यात आले आहे.
                                         – सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, प्रशासन

Back to top button