जेजुरीगड संवर्धनाची कामे लवकरच ! कामांसाठी देवसंस्थानकडून सहकार्य हवे | पुढारी

जेजुरीगड संवर्धनाची कामे लवकरच ! कामांसाठी देवसंस्थानकडून सहकार्य हवे

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्याचे कुलदैवत असणार्‍या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकास आराखड्याची शासकीय पातळीवरून मंजुरी मिळालेली आहे. यातील पहिल्या टप्प्यात जेजुरीगड संवर्धनांतर्गत कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाने दिली आहे. या कामाच्या दुसरा टप्पा 15 कोटी 34 लक्ष रुपयांचा असून, यामध्ये 154 पैकी 143 दीपमाळा, 14 कमानी (वेशी, 28 उपमंदिरे (देवकुळे) आदींचे जतन, संवर्धन व दुरुस्ती होणार आहे.

तिसरा टप्पा 14 कोटी 95 लक्ष रुपयांचा असून, गडकोटाच्या चारही मार्गांवरील सुमारे 1436 पाय-यांची दुरुस्ती होणार आहे. तिन्ही टप्प्यांतील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडे निविदा मंजुरी व वर्कऑर्डरची कार्यवाही पूर्ण होऊन जून 2023 पर्यंत कामांना सुरुवात होणार आहे.

या कामांमध्ये गडकोट पायरीमार्ग परिसर व्यवस्थापन करण्यात येणार आहे. प्रामुख्याने स्वच्छतागृहांची दुरुस्ती, चप्पलस्टॅण्ड, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, दर्शनरांग, नियोजित दुकाने, धार्मिक विधींसाठी जागा, देवसंस्थान कार्यालय, व्हीआयपी कक्ष, भाविकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था, अत्याधुनिक विद्युतगृह, कर्मचारी वर्गाला चेंजिंग रूम, चारचाकी वाहनतळ व्यवस्था आदींचा समावेश करण्यात आला आहे.

जून 2023 पर्यंत तिन्ही टप्प्यातील कामांना सुरुवात होणार आहे. मात्र, कामे करताना फार मोठ्या दिव्यातून जावे लागणार आहे. जत्रा-यात्रा उत्सव यामुळे देवदर्शन व धार्मिक विधींसाठी भाविकांची गर्दी रोजचीच असते. त्यांना कोणताही अडसर, अडचण निर्माण न करता कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे मंदिर प्रशासन व देवसंस्थानकडून सहकार्य अपेक्षित आहे, असेही आवाहन पुरातत्व खात्याने केले आहे.

ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ऐतिहासिक होळकर तलाव, मल्हार गौतमेश्वर मंदिर, जननी तीर्थ, पेशवे तलाव, बल्लाळेश्वर मंदिर, खटावकर विहिर आदी वास्तू-स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या वास्तूंची पाहणी पुरातत्व विभागाकडून करण्यात आली. यामध्ये पेशवे तलाव, होळकर तलाव स्वच्छता, दुरुस्ती, जतन, संवर्धन, दगडी पथ, पायरी दुरुस्ती, संरक्षक कुंपण, इंजिनघर डागडुजी, फ्लोरिंग फाऊंटन आदी सुविधा व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी अंदाजे 11 ते 12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी यांच्याकडे होणार बैठक

चिंचेच्या बागेत भाविकांकडून होत असलेले धार्मिक विधी आणि त्यांच्याकडून होत असलेले कचरा व निर्माल्य पाहता पुढील काळात देखभाल व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कुणावर सोपवायची? याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली.

Back to top button