बेलसर : वन विभागाने भागवली वन्यप्राण्यांची तहान | पुढारी

बेलसर : वन विभागाने भागवली वन्यप्राण्यांची तहान

बेलसर; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुका हा कमी पर्जन्यमान असलेला तालुका आहे. तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये गायरान व वन विभागीय क्षेत्र आहे. उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता भासते. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने पुरंदर वन विभागाने कृत्रिम पाणवठे दुरुस्त करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे.

सासवड वनक्षेत्रात पाण्याचे दुर्भीक्ष असल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासत आहे. वन्यप्राण्यांना जंगलातच व गायरानातच पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जंगलात पूर्वीचे जुने पाणवठे, काही ठिकाणी कृत्रिम व नैसर्गिक अशी एकूण 17 ठिकाणे उपलब्ध आहेत. त्यानुसार माळशिरस, सिंगापूर, वाघापूर, पिसर्वे, आंबळे, पारगाव, बोपगाव, वनपुरी, खानवडी, वाल्हा (भवानी माता मंदिर), हरणी, वीर, शिवरी, दवणेवाडी, पिंपळे, उदाचीवाडी, सासवड (वाघ डोंगर) या ठिकाणी वन विभागामार्फत टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.

वन विभागामार्फत वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरीही नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या पक्ष्यांसाठी व छोट्या-मोठ्या प्राण्यांसाठी लहान कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे. या पाणवठ्यांमुळे पाण्याची उपलब्धता होऊन पक्ष्यांना जीवनदान मिळणार आहे.

पुरंदर वन विभागामार्फत जुने पाणवठे दुरुस्त करून उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी टँकरने पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे. उन्हाळा संपेपर्यंत पाणवठ्यांत पाणी सोडण्यात येणार आहे.
                                                                  विशाल चव्हाण,
                                                      तालुका वन अधिकारी, पुरंदर.

Back to top button