नवी सांगवी : तयारपेक्षा घरगुती मसाल्याला पसंती; कांडप दुकानावर महिलांची गर्दी | पुढारी

नवी सांगवी : तयारपेक्षा घरगुती मसाल्याला पसंती; कांडप दुकानावर महिलांची गर्दी

नवी सांगवी : कासारवाडीमध्ये मसाला तयार करून घेण्यासाठी मिरची कांडप दुकानावर नागरिक सकाळपासून गर्दी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. भर दुपारी बाराच्या सुमारास तासंतास येथे बसून महिला चविष्ट मसाला तयार करून घेऊन जाताना दिसून येत आहेत. दरात तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ उन्हाळा सुरू झाला की मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मसाला तयार करून घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असते. सध्या बाजारात मिरची व मसाला याचे दर तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढले आहेत. खाद्य तेलाचे दर तर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. तरीदेखील महिला घरगुती चविष्ठ, खमंग मसाला खाण्याला पसंती देत आहेत.

मिरची कांडप दुकानातील दर स्थिर

बाजारपेठेत मिरची, खाद्य तेल आणि मसाल्याचे दर वाढले आहेत. मिरची कांडप दुकानातील दर मात्र स्थिर आहेत. याच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. कांदा मसाला, मिरची पावडर, धने पावडर, हळद, काळा मसाला, जिरे पावडर, घाटी मसाला, खारीक, खोबरे आदी मसाले येथील मिरची कांडप दुकानातून महिला कुटून नेताना दिसत आहेत. यासाठी हळद साठ तर इतर सर्व मसाल्यांसाठी पन्नास रुपये किलोने दर आकारला जात आहे, अशी माहिती येथील दुकानदार महेश कारळे यांनी दिली.

घरचा मसाला तयार करून वापरण्यात आणि खाण्यात एक वेगळीच चव असते. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मसाला तयार करण्यासाठी एक हजार ते बाराशे रुपये जास्त लागले.

                                          – दीपाली लांडे, गृहिणी, पिंपळे गुरव

ग्राहक गेल्या महिन्यापासून बेडगी मिरची, साधी मिरची त्यासाठी लागणारा मसाला खरेदीसाठी दुकानात येत आहेत. यावर्षी तेल, मिरची आणि मसाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

                                         – गणपत चौधरी, किराणा दुकानदार

उन्हाळ्यात मिरची चांगल्याप्रकारे वाळलेली असते. त्यामुळे पाच किलो मसाला तयार करण्यास साधारण एक तास लागतो. कोरोना काळ तसेच, महागाई जरी वाढली असली तरी ग्राहक वर्षभरासाठी लागणारा घरगुती मसाला तयार करून नेण्यासाठी गर्दी करत आहेत.
                                                  – महेश कारळे, कांडप मालक

Back to top button