महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात चालढकल | पुढारी

महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात चालढकल

 शिवाजी शिंदे : 

पुणे : राज्यात विविध महाविद्यालयांमधून वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत असलेल्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना मागील आर्थिक वर्षात केंद्र आणि राज्य यांच्या एकत्रित हिश्श्यातून 694 कोटी 98 लाख 95 हजार रूपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. त्याचा लाभ राज्यातील सुमारे 4 लाख 51 हजार विद्यार्थ्यांना झाला. मात्र महाविद्यालयांच्या आस्थापनाकडून होत शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात होत असलेल्या चालढकलीमुळे अजुनही 20 हजाराहून अधिक विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

तर कित्येक विद्यार्थ्यांचे वर्ष संपले तरी अजुन अर्ज समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे शिष्यवृती न मिळण्याचा फटका बसला आहे. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेता यावे तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सन 1960 पासून मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे .

ही योजना 2018-19 सालापासून महाडीबीटी पोर्टल व्दारे ऑनलाईन राबविण्यात येत आहे. महाविद्यालय स्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनचे शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज महाविद्यालयांच्या आस्थापनामार्फत ऑनलाईन भरून ते पुढे पाठविणे गरजेचे आहे. नेमके याच ठिकाणी राज्यातील विविध महाविद्यालयांच्या आस्थापना विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास चालढकल करीत असतात. जेणेकरून संबधित विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती मिळण्यास वेळ लागावा. आणि संबधित विद्यार्थ्यास फी भरण्यास भाग पाडणे हा त्या मागील उद्देश असल्याचे दिसून आले आहे. या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा सन 2018-19 पासून केंद्र सरकारने 60 टक्के हिस्सा उचलला आहे. तर 40 टक्के हिस्सा राज्य शासनाचा आहे. त्यानुसार 2022-23 या आर्थिक वर्षात राज्यातील साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना 694 कोटी 98 लाख 95 हजार रूपये इतक्या रकमेची शिष्यवृत्ती वाटप केले आहे. महाडीबीटी प्रणालीव्दारे ही शिष्यवृत्ती प्रदान केल्या आहेत.

– पात्रतेचे निकष-
विद्यार्थी हा अनुसुचित जाती व नवबौध्द प्रर्वगातला असावा
विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त नसावे
विद्यार्थी शालांत परीक्षोत्त व त्यापुढील शिक्षण घेत असावा
विद्यार्थी महाराष्ट्राचा राहिवाशी असावा

शिष्यवृत्ती लाभाचे स्वरूप
विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क, परीक्ष शुल्क व इतर शुल्क प्रदान
महिन्याला 230 ते 450 रूपये दराने निर्वाह भत्ता
वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 380 त ए 1200 रूपये निर्वाह भत्ता
सदर योजना केंद्र हिस्सा 60 टक्के तर राज्य हिस्सा 40 टक्के या प्रमाणे राबविण्यात येत आहे

Back to top button