खेड : शिरोली-पाईट-आंबोली मार्गाची दुरावस्था | पुढारी

खेड : शिरोली-पाईट-आंबोली मार्गाची दुरावस्था

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील महत्त्वाच्या शिरोली-पाईट-आंबोली या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती न झाल्याने आता संपूर्ण मार्गाचे नव्याने मजबुतीकरणासह डांबरीकरण करण्याची मागणी जनतेतून होत आहे. राजगुरुनगर शहराजवळच्या शिरोली गावापासून तालुक्याच्या पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी शिरोली-पाईट-आंबोली हा प्रमुख मार्ग आहे. शिरोलीपासून ते आंबोलीपर्यंत या मार्गाला अनेक गावांचे जोडमार्ग जोडले आहेत. त्यामुळे हा मार्ग दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

वांद्रा, आंबोलीपासून तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येण्यासाठी नागरिकांना रस्ता सुस्थितीत असणे, ही काळाची गरज आहे. प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या शिरोली-पाईट-आंबोली या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने सध्या हा मार्ग अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात उखडला असून, मार्गाला जागोजागी खड्डे पडले आहेत. मार्गाच्या साइडपट्ट्याची अवस्था तर अतिशय वाईट झाली आहे. गटारातील माती जेसीबीद्वारे काढून साइडपट्ट्यात टाकली जाते आणि टाकलेली माती जेसीबी यंत्राच्या पुढच्या तोंडाने दाबली जाते, ही साइडपट्ट्या भरण्यासाठीची पद्धत आहे. त्यामुळे साइडपट्ट्यात काही दिवसांत खड्डे पडतात.

ठेकेदाराचे ‘हम करे सो कायदा’
रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला बांधकामाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उभे राहून काम करीत नाहीत. त्यामुळे ठेकेदाराचे फावते आणि ‘हम करे सो कायदा’प्रमाणे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. सध्या शिरोली-पाईट-आंबोली या मार्गाची अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर-खडी निघून गेल्याने रस्त्याला खड्डे पडलेत, तर काही ठिकाणी रस्ता खचला आहे. डांबरी रस्त्याच्या कडा तुटल्याने रस्ता अरुंद झाला आहे.

Back to top button