जुन्नर शहरात पाण्याचा अपव्यय ! | पुढारी

जुन्नर शहरात पाण्याचा अपव्यय !

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : सर्वत्र कडक उन्हाळा जाणवत असून, अतिउष्णतेमुळे विहिरी, कूपनलिका, धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. जुन्नर नगरपरिषदेकडून शहरातील नागरिकांना एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. अशावेळी नळाद्वारे मिळणारे शुद्ध पाणी याचा वापर नागरिक व व्यापारीवर्गाकडून सकाळ, संध्याकाळ रस्त्यावर पाण्याचे सडे मारून होत आहे. पाण्याच्या होत असलेल्या या गैरवापराबाबत नगरपरिषदेकडून कारवाई होणे गरजेचे आहे.

कडक उन्हाचा त्रास कमी व्हावा तसेच घर आणि दुकानांमध्ये रस्त्यावरील धूळ येऊ नये म्हणून शहरातील नागरिक व व्यापारीवर्गाकडून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ पाण्याचे सडे रस्त्यावर मारण्याचे प्रमाण वाढले आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला नागरिकांना पिण्याकरिता आवश्यक म्हणून माणिकडोह धरणातून पाणी दिले जाते. सध्या माणिकडोह धरणात केवळ 13 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, कडक उन्हाळ्याचे दोन महिने अजून बाकी आहेत. बहुतांश ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागलेली असून, अनेक ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

मात्र, जुन्नरमधील नागरिकांना पाणीटंचाईची झळ अजून बसली नसल्याने पाण्याच्या बेसुमार वापर होत असून, याकरिता पिण्याचे शुद्ध पाणी वापरले जात आहे. शहरातील नागरिक व व्यापारीवर्गाने पाण्याच्या या होणार्‍या गैरवापराबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. जुन्नर नगरपरिषदेनेदेखील पिण्याचा पाण्याच्या होणारा गैरवापर थांबविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Back to top button