‘भाबी जी घर पर हैं’ अभिनेता फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन | पुढारी

'भाबी जी घर पर हैं' अभिनेता फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट फिरोज खान यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यांनी ‘भाबी जी घर पर है’ आणि ‘शक्तीमान’ या प्रसिद्ध कॉमेडी शोमध्ये काम केले. फिरोज खान हे अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणूनही ओळखले जात होते.  फिरोज खान उत्तर प्रदेशमधील काबुलपुरा येथील त्यांच्या घरी वास्तव्यास होते. आज (दि.23) सकाळी त्यांनी बदाऊनमध्ये अखेरचा श्वास घेतला. फिरोज खान यांनी 4 मे रोजी मतदार महोत्सवात शेवटचा परफॉर्मन्स केला होता. बदाऊनमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

फिरोज खान हे टीव्ही इंडस्ट्रितील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले. यामध्ये ‘भाभी जी घर पर है’, ‘हप्पू की उल्टान पलटन’, ‘साहिब बीवी और बॉस’, ‘शक्तिमान’ आणि ‘जिजा जी छत पर है’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्येही काम केले होते. इतकंच नाही तर फिरोज खान गायक अदनान सामीच्या ‘थोडी सी तू लिफ्ट करा दे’ या लोकप्रिय गाण्यातही दिसले होते.

अमिताभची डुप्लिकेट म्हणून मिळाली ओळख

फिरोज खान यांना टीव्ही शो आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्यापेक्षा मिमिक्रीमुळे जास्त प्रसिद्धी मिळाली. ते अमिताभ बच्चन यांची नक्कल करत असे. त्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. फिरोज यांना अमिताभचा डुप्लिकेट म्हटले जात होते. बिग बींची नक्कल करत त्यांनी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फिरोज अमिताभच्या चित्रपटातील दृश्ये आणि पात्रे पुन्हा तयार करायचे. बिग बींची डुप्लिकेट म्हणून त्यांनी लाइव्ह परफॉर्मन्सही केले आहेत.

फक्त अमिताभच नाही तर तो फिरोज खान, दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र आणि सनी देओल यांचीही नक्कल करत असे. फिरोज खान यांच्या आकस्मिक निधनाने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर चाहते फिरोज यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Back to top button