भीमाशंकर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर : बाळासाहेब बेंडे | पुढारी

भीमाशंकर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर : बाळासाहेब बेंडे

मंचर : पुढारी वृत्तसेवा : दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत सहकारमंत्री व संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या निर्णयानुसार सन 2024-25 हंगामासाठीच्या ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी दि. 25 मे 2024 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
बेंडे म्हणाले, ऊस लागवडीसाठी 25 मे 2024 ते 31 मार्च 2025 अखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये को. 86032, व्ही.एस.आय. 08005, एम. एस. 10001, को. 9057, को. व्ही. एस. आय. 18121, पी. डी. एन. 15012, को. एम. 11082, को. एम. 0265 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच मे 2024 अखेर को. 86032 या जातीच्या उसाची लागवड केलेल्या शेतकर्‍यांना गाळप हंगाम सन 2024-25 साठी तोड करावयाची असल्यास तो गाळपासाठी घेतला जाईल. त्याकरिता उसाची नोंद कारखाना शेतकी विभागीय कार्यालयात करावी.

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादकांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार ऊस बेणे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा 7/12 उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता विभागीय गट कार्यालयात देत बेणे मागणी नोंदवावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकर्‍यांनी 4 दिवसांच्या आत गट कार्यालयात येत ऊस नोंद करावयाची आहे. त्यानंतर उशिरा ऊस लागवड नोंद करण्यास आलेल्या ऊस उत्पादकांची नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविण्यात येणार्‍या ऊस विकास योजनेंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरूप जीवाणू खते, ऊस रोपे, बायोकंपोष्ट / प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्ही.एस.आय.चे मल्टीमायक्रो न्युट्रीएंट, ह्युमिक अ‍ॅसिड, वसंत ऊर्जा, जैविक कीटकनाशक बी. व्ही. एम., ई. पी. एन. इ. चा पुरवठा, खासगी ऊस लागवड अर्थसाहाय्य, ऊस पीक स्पर्धा आदींचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा.

तसेच ज्या शेतकर्‍यांना ऊस नोंदणीबाबत हरकत असल्यास लागवडीपासून 2 महिन्यांच्या कालावधीत कारखाना कार्यालयात येऊन हरकत नोंदवावी. कालावधीत हरकत नोंद न केल्यास पुढे हरकतीचा विचार केला जाणार नाही. ऊस पीक स्पर्धेंतर्गत भाग घेणार्‍या शेतकर्‍यांनी प्रवेश शुल्क रुपये 100 हे डिसेंबर 2024 अखेर भरून नावनोंदणी करावी. ऊस पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोळा केलेले हुमणी किडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रतिकिलो रुपये 300 प्रमाणे खरेदी केले जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी उसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

हेही वाचा

 

Back to top button