यवतमाळ : पोलीस निरीक्षकाच्या घरी चोरट्याचा डल्ला; ७० हजार पळविले | पुढारी

यवतमाळ : पोलीस निरीक्षकाच्या घरी चोरट्याचा डल्ला; ७० हजार पळविले

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून दारव्हासह जिल्ह्यात बंद घरे चोरट्याच्या रडारवर आहेत. दरम्यान आता दारव्हा येथील पोलिस निरीक्षकाच्या घरातूनच ७० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना पुढे आली असून या प्रकरणी सफाई कामगाराविरुद्ध दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दारव्हा ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी हे १२ ते १७ मे या कालावधीत सुटीवर गेले होते. त्यांच्या बंगल्याची चावी सफाई कामगार संतोष चव्हाण याच्याकडे ठेवण्यात येत असे. कुलकर्णी हे रजेवरून परतल्यानंतर त्यांनी माहिती घेतली असता सफाई कामगार संतोष हा १५ मेपासून कामावर येत नसल्याचे समजले. त्याला फोनवरून संपर्क करूनही तो कामावर न आल्याने त्याच्याबाबत संशय बळावला. कुलकर्णी यांनी घरातील बॅगेची पाहणी केली असता बॅगेतील ७० हजार रुपये जागेवर नसल्याचे आढळले. घराचा कडीकोंडा तसेच कुलूप सुरक्षित असल्याने ही चोरी सफाईकामगार संतोष यानेच केल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी चिलुमूला रजनीकांत यांनी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button