पारगाव : ‘स्वामी’ची घाटातली कामगिरी ठरतेय सरस | पुढारी

पारगाव : ‘स्वामी’ची घाटातली कामगिरी ठरतेय सरस

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : चांडोली बुद्रुक येथील एक बैल गावोगावच्या यात्रांमध्ये सरस कामगिरी बजावत आहे. ‘स्वामी’ असे त्याचे नाव आहे. शिंग तुटले, लम्पी आजार झाला, तरीही या सगळ्यावर मात करून जिद्दीने तो गावोगावच्या यात्रा गाजवत आहे. ‘स्वामी’च्या जिगरबाज वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. चांडोली बुद्रुक येथील बैलगाडामालक सचिन थोरात यांनी ‘स्वामी’ला लहानपणापासून सांभाळले. त्याला घाटात पळायला शिकविले. तो घाटात वार्‍याच्या वेगाने धावू लागला.

परंतु, गत वर्षी नांदूरमधील शर्यतीच्या घाटात जुपणी टाकताना त्याचे एक शिंग तुटून मोठी दुखापत झाली. परंतु, तो लवकरच त्यातून सावरला. त्यानंतर लम्पी या जीवघेण्या आजाराच्या साथीत त्यालाही लम्पीची लागण झाली. परंतु, थोरात यांनी रोगावरही ‘स्वामी’ने मात केली. ‘स्वामी’ सध्या यात्रा हंगामातील बैलगाडा शर्यतींमध्ये चमकदार कामगिरीने लक्ष वेधून घेत आहे. शर्यतींमध्ये घाटात वीस फुटांवरून कांड्याला ‘स्वामी’ बैलाला जुंपल्यास तो सर्वोत्तम कामगिरी करतो. विशेष म्हणजे, कोणत्याही बैलाबरोबर तो वार्‍याच्या वेगानेच धावतो.

‘स्वामी’ आमच्यासाठी लकी ठरला आहे. त्याचे शिंग तुटले, लम्पी आजार झाला. मात्र, त्यावर त्याने मात केली. यात्रांमधील बैलगाडामालक, शौकिनांचे तो लक्ष वेधून घेत आहे. ’स्वामी’मुळेच आमचीही ओळख निर्माण झाली आहे.

                                 – सचिन थोरात, बैलगाडामालक

Back to top button