पुणे : 25 दिवसांत घ्यावा लागणार आरटीई प्रवेश | पुढारी

पुणे : 25 दिवसांत घ्यावा लागणार आरटीई प्रवेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांच्या ऑनलाईन प्रवेशाची सोडत बुधवारी (दि. 5) झाली. महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यानुसार 1 लाख 1 हजार 969 मुलांना प्रवेश मिळणार आहे. 30 एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत आरटीईची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यंदा राज्यभरातून 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 64 हजार 390 इतके विक्रमी अर्ज आले आहेत. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सोडतीला प्रमुख उपस्थिती होते.

ऑनलाईन अर्जप्रक्रिया संपल्यानंतर प्रवेश निवडीसाठी सोडत काढण्यात आली. दि. 13 ते 25 एप्रिलपर्यंत पालकांना आपल्या पाल्यांचे प्रवेशाची कागदपत्रे तपासणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी दि. 30 एप्रिलपर्यंत प्रवेश घ्यायचे आहेत. निवड झालेल्यांना दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजल्यापासून प्रवेशासाठी एसएमएस पाठविण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

महत्त्वाच्या तारखा…
पालकांना एसएमएस मिळणार – दि.12 एप्रिलपासून
कागदपत्रे तपासणीचा कालावधी – दि. 13 ते 25 एप्रिल
प्रवेश निश्चितीची मुदत – दि.30 एप्रिलपर्यंत

ही काळजी घ्यावी…
25 टक्के प्रवेशप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जात असून, पालकांनी कुठल्याही दलाल अथवा संस्थांच्या प्रलोभनांना बळी पडू नये. या प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेशित होणार्‍या बालकांना कोणत्याही प्रकारे शाळेमध्ये वेगळी वागणूक दिली जाणार नाही अथवा भेदभाव केला जाणार नाही, याची खबरदारी शाळा प्रशासनाने घ्यायची आहे, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.

Back to top button