शेतकर्‍यांना द्राक्षे आंबटच ! दरात प्रचंड मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेना | पुढारी

शेतकर्‍यांना द्राक्षे आंबटच ! दरात प्रचंड मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेना

रियाज सय्यद : 

भवानीनगर : यंदा द्राक्षाला मागणी नसल्यामुळे दरात प्रचंड घसरण झाली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने बागा सोडून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. बँकेचा हप्ता कसा भरायचा? या विवंचनेने जणू त्याच्या जीवनातील गोडवाच हिरावून
घेतला आहे. मागील दोन वर्षांतील कोरोना, यंदा अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांना आर्थिक संकटात लोटले आहे. यंदा द्राक्षाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. बँकांनी कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला आहे. द्राक्षासाठी उत्पादन खर्चही निघेना, अशी परिस्थिती आहे.

यंदा द्राक्षाला किमान शंभर रुपये किलोपर्यंत भाव मिळेल, दोन वर्षांत झालेले नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या द्राक्षाला 20 ते 22 रुपये किलो भाव मिळत असून, उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकर्‍यांनी प्रचंड खर्च करून द्राक्षाचे उत्पादन घेतले. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला चांगला भाव मिळत होता. मात्र, अवकाळीनंतर दरात प्रचंड घसरण झाली. म्हणावी तशी आर्थिक आवक नसल्याने बँकांनी कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावू नये, अशी मागणी द्राक्ष उत्पादक करीत आहेत.

यंदा द्राक्षबागांना रोगाचा फारसा फटका बसला नाही, त्यामुळे चांगले उत्पादन झाले. परंतु, अवकाळीत बागा सापडल्यामुळे घडांमध्ये क्रॅकिंगचे प्रमाण वाढले व द्राक्षाची मागणी घटली. शिंदेवाडी येथील सोपान पवार यांनी तीस एकरांत द्राक्षाच्या माणिक, चमन, एस. एस. जम्बो, आर. के., कृष्णा या पाच जातींचे उत्पादन घेतले. कोणत्याच द्राक्षाला दर नसल्याची परिस्थिती आहे.

दोन वर्षे कोरोना, यंदा अवकाळीचा फटका

उत्पादनात वाढ; मात्र अवकाळीने घडांमध्ये क्रॅकिंग

दर्जा घटल्याने मागणीत घसरण

शंभर रुपये किलोच्या दराची अपेक्षा; मिळाला 22 रुपयांचा दर

बँकांकडून कर्जवसुलीचा तगादा

अवकाळी पावसाचा प्रचंड फटका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याला बसल्याने सरकारने किमान झालेला खर्च भरून निघण्यासाठी आर्थकि मदत जाहीर करावी.
                                           – सोपान पवार, द्राक्ष उत्पादक, शिंदेवाडी

Back to top button