आर्यन खान याला पकडून नेणाऱ्या गोसावी विरुद्ध पुण्यात फसवणुकीचा गुन्हा | पुढारी

आर्यन खान याला पकडून नेणाऱ्या गोसावी विरुद्ध पुण्यात फसवणुकीचा गुन्हा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला पकडून एनसीबी कार्यालयात नेणाऱ्या के. पी. गोसावी याच्यावर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिस गेल्या अडीच-तीन वर्षांपासून त्याला शोधत आहेत. दरम्यान ‘एनसीबी’च्या बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेला गोसावी पुणे पोलिसांना कसा सापडला नाही, असाही प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

‘एनसीबी’ने मुंबईच्या समुद्रात क्रूझवरील ड्रग पार्टीवर केलेल्या छापेमारीनंतर राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी केलेल्या आरोपांनंतर के. पी. गोसावी हे नाव चर्चेत आले आहे. एनसीबीचा अधिकारी नसतानाही गोसावी आर्यन खान याला पकडून एनसीबी कार्यालयात नेत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यावर गोसावीची सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्याच गोसावीचा पुणे पोलिसही शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

के. पी. तथा किरण गोसावी याच्याविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. गोसावी याने पुण्यातील एका तरुणाला मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांची फसवणूक केली होती. तेव्हापासून गोसावी हा पोलिसांना हवा आहे. फरासखाना पोलिसांनी देखील २०१८ चे रेकॉर्ड तपासून गोसावी याच्यावर दाखल गुन्ह्याची शहानिशा केली आहे. दरम्यान, मुंबईतील ड्रग पार्टीवर झालेल्या छापेमारीनंतर गोसावी अचानक माध्यमांत दिसून आला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेला गोसावी पुणे पोलिसांना गुंगारा देऊन राजरोस फिरत होता का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button