भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट तब्बल ३३३ टक्क्यांनी महागले - पुढारी

भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट तब्बल ३३३ टक्क्यांनी महागले

दुबई ; पुढारी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमानमध्ये यावर्षी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी -20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायहोल्टेज सामन्याची क्रीडा प्रेमी आतूरतेने वाट पाहत आहेत.

युएई आणि ओमान मधील हा टी २० विश्वचषक ४३ दिवस चालणार आहे. मात्र यातील २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत – पाकिस्तानचे यांच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०१९ नंतर दोन्ही संघ प्रथम पुन्हा एकदा आमनेसामने येतील. या दोन्ही देशांनी स्पर्धेसाठी आपापल्या संघांची घोषणा केली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तिकिटांची विक्री सुरू होताच चाहत्यांमध्ये ती खरेदी करण्याची स्पर्धाच पाहायला मिळत होती. अवघ्या तासाभरात सर्व तिकिटे विकली गेली. भारत विरूद्ध पाकिस्तान हा हायवोल्टेज सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी एका तिकिटासाठी लाखो रुपये मोजत आहेत. तिकीट ३३३ टक्के अधिक महाग विकलं जात आहे.

या सामन्यातील सर्वात महागड्या तिकीटाचा दर २ लाखाच्या घरात आहे. वेगवेगळ्या बैठकीसाठी वेगवेगळी किंमत मोजली जात आहे. या तिकिटांची १२,५०० रुपयांपासून सुरुवात आहे. या व्यतिरिक्त ३१,२०० आणि ५४,१०० रुपयात क्रिकेटप्रेमी तिकीट खरेदी करू शकतात. या तिन्ही कॅटेगरीचे तिकिटं जवळपास संपली आहेत. मात्र भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या ३१ ऑक्टोबरच्या सामन्यासाठी व्हीआयपी तिकीटाची किमत १ लाख ९६ हजार रुपये आहे. हा दर पाहता भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट दर २ लाखाच्या घरात असण्याची शक्यता आहे. कारण भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी सर्वात कमी दर असलेलं तिकीट १०,४०० रुपये आहे.

टी 20 वर्ल्ड कपच्या ७ व्या हंगामातील ही स्पर्धा भारतात होणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा युएईला स्थलांतरित करण्यात आली आहे. २०१६ मधील अखेरची टी-२० वर्ल्ड कपची स्पर्धा भारतातच झाली होती. या स्पर्धेत वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते. या विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना १७ आक्टोबर रोजी ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. याच दिवशी बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातही सामना होईल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना २३ आक्टोबरला अबु धाबीच्या मैदानात खेळवण्यात येईल. भारतीय संघाचा सामना २४ आक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.

टीम इंडियाने २००७ पासून टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा वनडे वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे. इंडिजने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे संघ देखील विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.

Back to top button