

यड्राव, पुढारी वृत्तसेवा : अन्य दोन पुरुषांसोबत अफेअर चालू आहे हे प्रियकरास समजल्यामुळे प्रेयसीने चाकूने मारून जखमी केल्याची फिर्याद प्रियकराने दिली आहे. प्रज्योत शिवाजी धनवडे (वय 23, रा. कबनूर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी दिलशाद इलाई मुल्ला (36, रा. रेणुकानगर यड्राव) यांच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दोघेही एकमेकांचे ओळखीचे असून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. यातील संशयिताचे आणखी दोन पुरुषांसोबत अफेअर सुरू असल्याबाबत प्रज्योतला समजले होते. त्यावेळी तो संशयितेस तोरणानगर येथे भेटला. त्यावेळी तिने आपण नंतर भेटू असे सांगितल्याने प्रज्योत वाट पाहात अल्फोन्सा हायस्कूलच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानात थांबला होता. 5 मे रोजी रात्री 9 च्या सुमारास संशयितेने सोबत आणलेला चाकू अचानक काढून प्रज्योतवर वार केला. तिने त्याच्या उजव्या हाताच्या पंजावर चाकूने मारून गंभीर जखमी केले. त्याबाबत यातील फिर्यादी याने आयजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.