पुणे : आरटीई प्रवेशासाठी यंदा उच्चांकी नोंदणी शक्य! | पुढारी

पुणे : आरटीई प्रवेशासाठी यंदा उच्चांकी नोंदणी शक्य!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांच्या पहिली आणि नर्सरीच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत यंदा उच्चांकी अर्ज दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत. नोंदणी सुरू झाल्यानंतर गेल्या चारच दिवसांत तब्बल 98 हजार 499 पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) स्वयंअर्थसाहाय्यित, खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येतात.

संबंधित शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेला बुधवारी (दि.1) मार्चपासून सुरुवात झाली आहे. तर पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी 17 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 828 शाळा असून, त्यामध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

पुणे जिल्ह्यात 936 शाळांमध्ये 15 हजार 655 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. यासाठी 21 हजार 403 बालकांचे अर्ज नोंदविण्यात आले आहेत. नागपूरमध्ये 12433, ठाण्यात 8973, नाशिकमध्ये 5863, छत्रपती संभाजीनगरात 5175, रायगडमध्ये 3646, मुंबईमध्ये 5255, अहमदनगरमध्ये 2473 जळगावमध्ये 2983 नांदेडमध्ये 2946 याप्रमाणे अर्ज नोंदणी झाली आहे. नोंदणीसाठी अद्यापही 12 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे आणि चारच दिवसांमध्ये 1 लाखाच्या आसपास नोंदणी झाल्यामुळे यंदा आरटीई प्रवेशासाठी उच्चांकी नोंदणी होणार असल्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी वर्तविली आहे.

Back to top button