भोर येथील सम्राट चौकात युवकाचा खून | पुढारी

भोर येथील सम्राट चौकात युवकाचा खून

भोर, पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या आरोपातून वर्षभरापूर्वी जामिनावर सुटलेल्या युवकाचा त्याच्याच चार मित्रांनी भोर शहरातील सम्राट चौकात (पुणे क्राईम) दारूच्या बाटल्या व धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि. २) रात्री उशिरा घडली, चारही आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

मृत आणि त्याचे चार मित्र एकत्र मद्यपान करीत असताना अचानक त्यांची भांडणे होऊन त्यात हा प्रकार घडला. आनंद गणेश सागळे (वय-२३, रा. नागोबा आळी, भोर) असे खून झालेल्याचे नाव आहे. यातील फरारी आरोपी सनी सुरेश बारंगळे, अमीर महम्मद मनेर, समीर महम्मद मनेर (रा. नवी आळी, भोर) सिद्धांत संजय बोरकर (स्टेट बँकेशेजारी, भोर) सर्व जण सम्राट चौकातील आडोशाला शनिवारी (दि. २) रात्री ११.३० वाजता मृत आनंद सागळेसह मद्यपान करीत बसले होते.

मद्यपान होत असताना सागळे व इतर चार आरोपी यांच्यात भांडण झाले, त्यानंतर चौघांनी आनंद सागळे याला दारूच्या बाटल्यांनी, तसेच धारदार शस्त्रांनी डोक्यात, तोंडावर जबरी मारहाण करीत त्याचा खून केला, अशी फिर्याद वर्षा गणेश सागळे (वय ४७, रा. नागोबा आळी, भोर) यांनी दिली आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, उपनिरीक्षक बळीराम सांगळे, हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस, अमोल मुऱ्हे, यशवंत शिंदे, अविनाश निगडे, राहुल मखरे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनीही भेट देऊन आरोपी तपासासाठी मार्गदर्शक सूचना केल्या. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे करीत आहेत.

जुन्या वादाचा संशय

चार मित्रांनी एकत्र येऊन ज्याचा खून (पुणे क्राईम) केला त्या आनंद गणेश सागळे याने १८ जानेवारी २०१९ रोजी भोर तालुक्यातील पारवडी येथे एक युवकाचा खून केल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याने तो येरवडा कारागृहात होता. एक वर्षापासून तो जामिनावर बाहेर आला होता त्यामुळे आनंद सागळेचा खून जुन्या वादातून झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

Back to top button