पुणे : पोषण आहाराअभावी बालकांचे हाल | पुढारी

पुणे : पोषण आहाराअभावी बालकांचे हाल

दत्तात्रय नलावडे : 

वेल्हे : मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी सोमवार (दि. 20)पासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या राज्यव्यापी बेमुदत संपाचा मोठा फटका अतिदुर्गम वेल्हे तसेच डोंगराळ सिंहगड, पश्चिम हवेली तालुक्यातील अंगणवाड्यातील कष्टकर्‍यांच्या बालकांना बसला आहे. संपामुळे तीन दिवसांपासून अंगणवाड्या उघडल्या नाहीत. त्यामुळे दररोज सकाळी नाश्ता, सकस आहाराच्या आशेने अंगणवाडीत येणार्‍या आदिवासी, गोरगरीब, कष्टकर्‍यांच्या चिमुरड्या तशाच परत जात आहेत. यात कमी वजनाची कुपोषण स्तरावरील बालकेही आहेत.

गावोगाव तसेच तालुक्याच्या ठिकाणी मोर्चा काढल्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जिल्हा परिषद मुख्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे साकडे घातले. मात्र, तिसर्‍या दिवशीही बुधवारी (दि. 22) बेमुदत संपावर तोडगा निघाला नाही. मागण्या मान्य न झाल्यास दि. 28 फेब्रुवारी रोजी मुंबईत आझाद मैदानावर सत्याग्रह करण्याचा निर्धार अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. बेमुदत संपामुळे अंगणवाड्या जादा दिवस बंद राहिल्यास कुपोषण स्तरावरील बालकांसह सर्व बालकांचे सकस आहाराअभावी मोठ्या प्रमाणात कुपोषण होण्याची शक्यता आहे. असे असले तरी बेमुदत संपामुळे बालकांच्या सकस आहाराची पर्यायी व्यवस्था करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.

दरम्यान, पानशेत रस्त्यावरील खानापूर (ता. हवेली) येथे काढण्यात आलेल्या मोर्चात अंगणवाडी सेविका शारदा जावळकर, संगीता सपकाळ, विमल कांबळे, प्रियांका पायगुडे, अंजली बिराजदार आदी सेविका आणि मदतनीसांसह माजी सरपंच शरद जावळकर, नीलेश जावळकर, हवेली तालुका व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नंदूशेठ जावळकर आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

अतिदुर्गम भागांत 133 अंगणवाड्या
अतिदुर्गम पानशेत, वरसगाव, राजगड, तोरणा खोर्‍यांसह वेल्हे तालुक्यात 108 अंगणवाड्या आहेत. तर सिंहगड पश्चिम हवेली भागात शंभराहून अधिक अंगणवाड्या आहेत. एकट्या खानापूर (सिंहगड) बीटमध्ये 23 अंगणवाड्या आहेत.

वर्षानुवर्षे बालकांना तुटपुंज्या खर्चात नियमित सकस आहार दिला जात आहे. मात्र, इंधनभत्ता व इतर खर्चात वाढ नाही. अनेक अंगणवाड्यांचे भाडेही मिळत नाही. संपामुळे सरकारला कुपोषणाची फारच चिंता वाटत आहे.
                                    साधना जगताप, पानशेत विभाग कृती समिती, सदस्या.

अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांच्या संपावर तोडगा लवकरच निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अंगणवाड्या सुरू करण्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्यावर निर्णय झाला नाही. मात्र, बालकांची गैरसोय दूर करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
                 जामसिंग गिरासे, बालविकास प्रकल्प विभागप्रमुख, जिल्हा परिषद.

Back to top button