‘एआय’ तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करू शकतं? | पुढारी

‘एआय’ तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करू शकतं?

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर तंदुरुस्ती आणि आरोग्य क्षेत्रात सध्या ‘एआय’चा वापर वाढत चालला आहे. एका अहवालातील अंदाजानुसार 2022 मध्ये याचं बाजारमूल्य 7.8 बिलियन होतं आणि 2030 पर्यंत ते 35.6 बिलियनवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘एआय’चा वापर करणार्‍या फिटनेस अ‍ॅप्सची संख्या दिवसेंदिवेवस वाढत चालली आहे. ‘एआय’वर चालणार्‍या फिटनेस अ‍ॅप्सच्या वाढलेल्या वापरावरून असं लक्षात येतंय की, काही लोकांना माणसांपेक्षा संगणकाशी संवाद साधणं अधिक सोयीस्कर वाटू लागलंय. तर काहीजणांना स्वत:चा खासगी प्रशिक्षक आपल्या खिशातच असणं हे सोयीचं वाटत असावं. परंतु माणसांमधील संवादातून मिळणार्‍या प्रोत्साहनाची जागा ‘एआय’ खरोखरच घेऊ शकतं का?

व्यायाम प्रशिक्षक आणि फिजिओथेरपिस्ट एस्थर फॉक्स यांना असं वाटत नाही. लोकांना त्यांच्या ओळखीच्या आणि विश्वासू व्यक्तींशी बोलायचं असतं, असं त्या म्हणतात. त्यासाठी मला ‘एआय’चा वापर करता येणार नाही. लोकांशी संवाद केल्याने परिणाम साधता येऊ शकतो, असं मिस फॉक्स म्हणतात. आपलं म्हणणं कुणीतरी ऐकतंय हे जेव्हा लोकांना समजतं तेव्हा ते तुमचं ऐकतात आणि ते तुम्ही सांगाल त्याप्रमाणे करतात, असं त्या म्हणतात. त्या म्हणाल्या, आरोग्य आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता असते ज्याची जागा ‘एआय’ घेऊ शकत नाही. याउलट,  टिश धावपटू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या डेसिरी हेन्री या मॅजिक एआय फिटनेस मिररच्या स्क्रीनवर दिसणार्‍या ‘एआय’ प्रशिक्षकांचा आवाज आणि शरीरांपैकी एक आहेत. तुम्ही घरी एकट्याने व्यायाम करत असलात तरी व्यायाम करताना तुमच्यासोबत पूर्णवेळ कुणीतरी आहे, असं तुम्हाला वाटतं, असं त्या म्हणतात.

बहुतांश ‘एआय’ फिटनेस अ‍ॅप्स गोष्टी एकटेपणाने करण्याच्या उद्देशाने डिझाईन केलेल्या असताना, आता अशाप्रकारची पहिली जिम सुरू झाली आहे, जिथे ‘एआय’ प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षित केले जाणारे सर्वजण एकत्रिपणे व्यायाम करू शकतात. डलास, टेक्सास येथील ल्युमिन फिटनेसच्या अंधार्‍या स्टुडिओच्या जागेत भिंतींवर एलईडी स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत जिथे ‘एआय’ वैयक्तिक प्रशिक्षक एकावेळी जिममधील 14 जणांना वैयक्तिक वर्कआऊटस् किंवा टप्प्याटप्प्याने कठीण होत जाणारं प्रशिक्षण देतात. प्रत्येक व्यक्तीला एक जागा नेमून दिलेली असते जिथे मास्क सेन्सर्स स्क्रीन असतात, जे व्यायाम करणार्‍याच्या हालचाली टिपतात, तसेच जिमसाठी खास तयार करण्यात आलेली उपकरणं, ज्यात डंबेल, मेडिसिन बॉल आणि दोरी उड्यांची दोरी यांचा समावेश असतो. त्यानंतर त्यांना हेडफोनद्वारे ‘एआय’ कडून तोंडी अभिप्राय मिळतो. स्टुडिओमधील सेन्सर्सद्वारे वर्गातील प्रत्येक सदस्यावर लक्ष ठेवलं जातं, त्यांच्या फॉर्मचं निरीक्षण केलं जातं आणि प्रत्येक हालचालीवर अभिप्राय दिला जातो, असे सहसंस्थापक आणि लुमिन फिटनेसचे मुख्य कार्यकारी ब्रँडन बीन सांगतात.

असे असले तरी वर्गात एक मानवी प्रशिक्षक देखील हजर असतो. आम्ही प्रशिक्षकांच्या प्रतिभेची जागा घेण्याचा प्रयत्न करत नाही आहोत, असं मिस्टर बीन सांगतात. चांगल्या अनुभवासाठी आम्ही त्यांना उपकरणं देत आहोत. समुदायाला एकत्रित ठेवण्यासाठी प्रशिक्षक खूप महत्त्वाचा असतो. जे प्रत्यक्षात एकमेकांना टाळ्या देतात, एकमेकांसोबत हसतात. काही गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. फिजिओथेरपिस्ट लुसी मॅकडोनाल्ड म्हणतात की, एआय योग्यरीत्या प्रोग्राम केलं असल्यास, लोकांच्या व्यायामातील प्रगतीमध्ये मदत करण्याबाबत मला त्यात मोठ्या प्रमाणात क्षमता असल्याचं दिसून येतं. पण त्या इशारा देतात की, ‘एआय’ नेहमीच सर्व गोष्टी योग्यप्रकारे करू शकत नाही आणि त्यामुळे लोकांनी प्रशिक्षण किंवा दुखापतीचा धोका पत्करण्यापूर्वी मानवी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Back to top button