75 हजार वर्षांपूर्वीच्या महिलेला मिळाला चेहरा! | पुढारी

75 हजार वर्षांपूर्वीच्या महिलेला मिळाला चेहरा!

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी एका निएंडरथल महिलेचा चेहरा पुन्हा एकदा बनवला आहे. ही महिला 75 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर वावरत होती. इराकी कुर्दीस्तानच्या शनिदर गुहेत तिच्या कवटीचे अवशेष सापडले होते. या अवशेषांचा वापर करून ही महिला कशी दिसत असावी याचे कल्पनाचित्र तयार करण्यात आले आहे. ही गुहा एक महत्त्वाचे पुरातत्त्व स्थळ असून तिथे 1950 च्या दशकात किमान दहा निएंडरथल व्यक्तींचे अवशेष शोधण्यात आले होते.

या गुहेत ज्या महिलेची कवटी आढळली होती तिला ‘शनिदर जेड’ असे नाव देण्यात आले होते. सुरुवातीला ही कवटी एखाद्या डोशासारखी सपाट होती, जी एका दगडाच्या वजनाने दबली होती. हा दगड अनेक वर्षांपूर्वी गुहेच्या छतातून खाली पडला होता. उत्खननात ही कवटी सापडली, त्यावेळी तिची हाडे बिस्किटासारखी नाजूक झाली होती. या कवटीचे 200 तुकडे झाले होते. ते जोडून कवटीचा आकार बनवण्यासाठी पुरातत्त्व संशोधकांना एक वर्षापेक्षाही अधिक काळ लागला. या काळात त्यांना अतिशय सावधगिरीने हे काम करावे लागले.

आता याच कवटीच्या आधारे या महिलेचा चेहरा एकेकाळी कसा दिसत असेल याचे हे कल्पनाचित्र बनवले आहे. त्यासाठी पेलियो कलाकारांनी एक थ्रीडी मॉडेल तयार केले. हे मॉडेल केवळ एक वैज्ञानिक यश नसून ते भूतकाळातील एका मानव प्रजातीशी जोडणारा सेतूही आहे. केम्ब्रिज विद्यापीठातील जीवाश्म संशोधक डॉ. एम्मा पोमेरॉय यांनी याबाबतच्या संशोधनाचे नेतृत्व केले. आधुनिक मानव ज्यांच्यापासून विकसित झाला त्या होमो सेपियन्सपेक्षा ही निएंडरथल प्रजाती वेगळी होती. सुमारे 40 हजार वर्षांपूर्वी ही प्रजाती लुप्त झाली. मात्र तत्पूर्वी या दोन्ही प्रजातींचा एकमेकींशी संबंध आलेला होता.

Back to top button