Loksabha election | बारामतीत भर सभेत फोडले मडके; नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी | पुढारी

Loksabha election | बारामतीत भर सभेत फोडले मडके; नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

बारामती : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक प्रचारात अतिउत्साहाने केलेली एखादी कृतीसुद्धा अडचणीची ठरू शकते, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत बारामती तालुक्यात आला. माळेगाव बुद्रुक येथे भर सभेत फोडलेले मडके प्रचाराच्या अखेरीस गाजले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर हात वर केले, तर आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला.
माळेगाव येथे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांनी भर सभेत मडके फोडले. अजित पवार यांना साथ दिली नाही, तर पाण्याचे काय हाल होतील? हा प्रश्न कोण सोडवणार? असा त्यांचा रोख होता.

परंतु, हिंदू संस्कृतीत मडके फोडण्याचा वेगळा अर्थ घेतला जातो. सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत आमदार रोहित पवार यांनी या विषयावरून अजित पवार गटाला घेरले. हिंदू संस्कृतीचा दाखला देत प्रश्न उपस्थित केले. इकडे सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सांगता सभेत अजित पवार यांनी या विषयावर थेट हात वर केले. ही कृती कोणी केली? का केली? हे माहीत नसल्याचे ते म्हणाले. त्यावर शरद पवार गटाने लागलीच कडी केली. गेल्या महिन्यात कोल्हापूरच्या सभेला अजित पवार हेलिकॉप्टरने गेले, त्यावेळी रविराज तावरे त्या हेलिकॉप्टरमध्ये होते. तावरे यांनी त्याचा व्हिडीओ तयार केला होता. त्याचा दाखला देत यामागे ब्रेन कोणाचा, असा सवाल शरद पवार गटाने उपस्थित केला. त्यानंतर आमदार अमोल मिटकरी अजित पवार गटाच्या मदतीला धावले. रविराज यांची ती कृती पाण्याच्या प्रश्नासाठी होती. मात्र, बाल मित्रमंडळाच्या अध्यक्षांनी याचे वेगळेच भांडवल केले, असे म्हणत रोहित पवारांना कोंडीत पकडले. मडके फोडीची ही कृती प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात चर्चेचा विषय ठरली.

हेही वाचा

Back to top button