तेहरान : एखाद्या ठिकाणी चक्क माशांचा पाऊस पडला, असे वृत्त आपण कधी तरी वाचलेले असेलच. अर्थातच यामध्ये काल्पनिक काही नसते आणि आपण जी कल्पना करतो तसेही काही नसते. सोप्या भाषेत सांगायचे तर वादळामुळे पाण्यातील मासे उडून अन्यत्र जाऊन पडत असतात. ते जिथे पडतात तेथील लोकांना वाटते की माशांचा पाऊस पडला! आता इराणमध्ये अशीच एक घटना घडली आहे.
इराणच्या यासुज भागात ही दुर्मीळ घटना घडली. तिथे शहरात चक्क आकाशातून मासे पडत होते. त्यापैकी अनेक मासे जिवंत होते व ऑक्सिजनअभावी रस्त्यावर तडफडतही होते. अचानक माशांचा असा पाऊस पडताना पाहून लोक अचंबित झाले. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामध्ये आकाशातून मसे पडत असताना दिसून येते. अर्थातच ही घटना एका शक्तिशाली चक्रीवादळामुळे घडली. या वादळाने माशांना समुद्रातून आकाशात उडवले व नंतर जमिनीवर फेकले! त्यामुळे अनेक भाबड्या लोकांना आकाशातून माशांचा पाऊस पडत आहे असे वाटू लागले. याबाबतचा व्हिडीओही व्हायरल झाला असून तो एक लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.