पिंपरी : सुरक्षा रक्षकच बनताहेत भक्षक ; सोसायटीत घडलेल्या गैरप्रकारांमध्ये सुरक्षारक्षकांचाही सहभाग | पुढारी

पिंपरी : सुरक्षा रक्षकच बनताहेत भक्षक ; सोसायटीत घडलेल्या गैरप्रकारांमध्ये सुरक्षारक्षकांचाही सहभाग

संतोष शिंदे : 

पिंपरी : आपले घर, परिवार सुरक्षित राहावा, यासाठी सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. त्यासाठी दरमहा पैसे मोजले जातात. मात्र, अलीकडे हेच सुरक्षा रक्षक सोसायटीत चोर्‍या, अल्पवयीन मुलींसह महिलांचे विनयभंग यासारखे प्रकार करू लागले आहेत. त्यामुळे आपण निवडलेल्या एजन्सीकडे खात्रीलायक तसेच पोलिस पडताळणी झालेले सुरक्षा रक्षक आहेत का, हे तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे, की उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक छोट्या मोठ्या सोसायट्या आहेत. सोसायट्यांच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नियुक्त केले जातात. त्यासाठी सुरक्षा एजन्सीला कंत्राट दिले जाते. मात्र, अलीकडे काही दिवसांपासून सोसायटीत घडलेल्या गैरप्रकारांमध्ये सुरक्षारक्षकांचा सहभाग असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येऊ लागली आहे. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी सोसायटीने कंत्राट दिलेल्या सुरक्षा एजन्सीमध्ये खात्रीलायक तसेच पोलसि पडताळणी असलेले सुरक्षारक्षक आहेत का, याची फेर तपासणी करण्याची गरज आहे.

उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
एका संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. सुरक्षा रक्षकांना पोलिस पडताळणी करण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीसाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. यात त्यांचे नुकसान होत असल्याने पोलिस पडताळणीची अट शिथिल करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. यावर न्यायालयाने सुरक्षा रक्षकांवर नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली जाते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे सांगून याचिका फेटाळली होती.

गंभीर गुन्ह्यात सुरक्षा रक्षक
निगडी येथे एका सोसायटीत काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाने कोट्यवधींचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. तसेच, कंपनीतील एका अधिकार्‍यासोबत मिळून सुरक्षा रक्षकाने पाच लॅपटॉपचा अपहार केल्याचा प्रकारही निगडी येथे उघडकीस आला आहे. एमआयडीसी भोसरी परिसरात सुरक्षा रक्षकाने दीड लाखांचे साहित्य चोरून नेल्याची नोंद आहे. सोसायटीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पिंपरी येथे सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका सुरक्षारक्षकाला नुकतेच अटक केली आहे.

…म्हणून पडताळणी आवश्यक
सुरक्षा रक्षकांची पोलिस पडताळणी केल्यास संबंधित इसमाची सर्व माहिती पोलिसांकडे आद्यवत होते. तसेच, पडताळणीमधून गुन्हेगारी पार्श्वभूमी दिसल्यास त्यावर आवश्यक कारवाई केली जाते. त्यामुळे सुरक्षा रक्षक नेमताना नागरिकांनी पडताळणी झालेले सुरक्षा रक्षकच तैनात करण्याची मागणी संबंधित एजन्सीकडे करावी.

परप्रांतीयांचा भरणा
शहरात नोकरीच्या शोधात आलेले परप्रांतीय सुरक्षारक्षक म्हणून कमी पगारात काम करतात. अनेक सोसायट्यांमध्ये एकच सुरक्षा रक्षक दोन्ही पाळ्यांमध्ये काम करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे हे सुरक्षारक्षक रात्रीचे बिनघोर झोपून असतात. एजन्सी मालकही पैशाची बचत होत असल्याने अशा परप्रांतीयांना प्राधान्य देतात. मात्र, अशा परप्रांतीयांकडून गुन्हे घडल्यास त्यांना शोधून काढताना पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

पोलिसांनी घ्यावा ड्राईव्ह
शहरातील किती सुरक्षा रक्षकांची पोलिस पडताळणी झाली आहे. याबाबत पोलिसांनी देखील एक स्पेशल ड्राईव्ह घेण्याची गरज आहे. ज्यामुळे एजन्सी मालक देखील खडबडून जागे होतील. शहरात मागील वर्षभरात केवळ आठ हजार 153 सुरक्षकांनी पोलिस पडताळणी केल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुरक्षा रक्षक शहरात तैनात आहेत.

अशी करा पोलिस पडताळणी

पोलिस पडताळणी करण्यासाठी शासनाने ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. लिी.ारहरेपश्रळपश.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर भेट देऊन तिथे प्रथम नोंदणी करावी. त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरावा. अर्जामध्ये नाव, पत्ता आणि इतर माहिती द्यावी. फी भरल्यानंतर अर्ज जमा करावा. अर्ज जमा झाल्यानंतर सुरुवातीला स्थानिक पोलिस कागदपत्रांची पडताळणी करतात. त्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी अर्ज पोलिस आयुक्तालयातील पडताळणी शाखेत येतो. तेथे पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराचा अर्ज मंजूर होतो. अर्जदाराच्या नावाशी जुळणारे एखाद्या गुन्हेगाराचे नाव आढळल्यास तसेच इतर त्रुटी राहिल्यास पडताळणी शाखेतून खातरजमा केली जाते. पडताळणी शाखेतून अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदाराला पोलिस पडताळणी प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याबाबत संदेश प्राप्त होतो.

Back to top button