ओतूर : बिबट सफारी प्रकल्प कामाला सुरुवात कधी ? | पुढारी

ओतूर : बिबट सफारी प्रकल्प कामाला सुरुवात कधी ?

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यात ऊसतोडणी वेगात सुरू असून, लपण जागा संपल्याने अन्न-पाण्यासाठी नागरी वस्तीत बिबटे येण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. परिणामी, शेतकरी व नागरिक घाबरले असून, बिबट सफारीचा प्रकल्प सुरू केव्हा होणार? असा सवाल विचारत आहेत. बिबट्याने शेतकर्‍यांच्या शेळ्या-मेंढ्या, पाळीव कुत्र्यांबरोबरच माणसावरील हल्लेही वाढले आहेत.

परिणामी, जिवाच्या भीतीने उत्तर पुणे जिल्ह्याच्या गावागावात घरांचे दरवाजे सायंकाळी 6 च्या सुमारास बंद होऊ लागले आहेत. शेतीकामांवरही विपरीत परिणाम होऊन शेतकर्‍यांना भीतीच्या छायेतच शेतात जावे लागत आहे. शेतीपूरक व्यवसाय कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय तसेच शेतमालाला बाजारभावाची हमी नसल्याने शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडत आहे. अशा परिस्थितीत बिबट्याच्या वाढत्या वावराला आवर घालण्यासाठी तरी आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथील बिबट्या सफारी प्रकल्पाच्या कामाला तत्काळ चालना देऊन शेतकरी व नागरिकांना भयमुक्त करावे, अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे.

बिबट्याच्या गरजा जंगलातच भागवा
बिबट्या हल्ल्यांच्या घटना घडू नयेत, म्हणून जंगलात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय करावी. बिबट्या काही गवत खाणारा प्राणी नव्हे, त्याला त्याचे अन्न जंगलातच उपलब्ध झाले, तर तो मानवी वस्त्यांकडे ढुंकूनही पाहणार नाही. मात्र, कुठेतरी शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. बिबट सफारी प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय ही धोकादायक परिस्थिती सुधारू शकत नाही. बिबट्यांबरोबरच मानवी जिवाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. बिबट संरक्षण, वन संरक्षण, मानव संरक्षण यांची सांगड घालण्यासाठी आंबेगव्हाण येथील बिबट्या सफारी प्रकल्प कामाला तत्काळ चालना देऊन उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Back to top button