सांगवी फाटा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक | पुढारी

सांगवी फाटा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक

संतोष महामुनी

नवी सांगवी : सांगवी फाटा येथील सांगवी, पिंपळे गुरवकडे येणार्‍या भुयारी मार्गात गेली काही दिवस सांडपाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाण्यामुळे शेवाळ निर्माण होऊन रस्ता निसरडा झाला आहे. वाहतुकीसाठी भुयारी मार्गातील वळण मार्गावरील रस्ता दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून, अपघात घडून येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सांगवी फाटा ते नवी सांगवी, पिंपळे गुरव या रस्त्याच्या मार्गावरील भुयारी मार्गात वळणावरील रस्त्यावर गेली काही दिवस अंतर्गत पाईपलाईन तसेच ड्रेनेज तुंबून गळती होत असल्याने पूलाच्या आतील भागात मध्यवर्ती ठिकाणी ड्रेनेज तुंबल्याने गळती होऊन दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याचे पहावयास मिळाले. हे सांडपाणी नागरिकांच्या आजारपणाला निमंत्रण देणारे आहे. याचा नाहक त्रास येथून येणार्‍या वाहन चालकांना गेली काही दिवस सहन करावा लागत आहे.

या ठिकाणी चार वर्षांपूर्वी शहराच्या विकासात भर टाकण्यासाठी वाहतूक सुरळीत होण्यासाठी अंतर्गत भुयारी मार्ग तयार करण्यात आला होता. सध्या हा भुयारी मार्गच आता नागरिकांना अडचणीचा ठरू पाहत आहे. येथील अंतर्गत भागात वळण मार्गावर सतत ड्रेनेज लाईन तसेच इतर भूमिगत पाईपलाईनमधून गळती होत आहे. त्यामुळे भिंतींवर, रस्त्याच्या कडेला पाणी झिरपून रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

भुयारी मार्गावरील वळण मार्गावर सतत अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. वेळोवेळी यासंदर्भात संबंधित बीआरटी अधिकारी तसेच महापालिका प्रशासनास याबाबत नागरिकांनी तक्रार केली असता प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे. प्रशासन मात्र दिखावा करून तात्पुरती उपाययोजना करीत आहे. मात्र, पुन्हा काही दिवसात ‘जैसे थे’ परिस्थिती पाहावयास मिळते.

सध्या पुण्याहून येणार्‍या वाहन चालकांना सांगवी, पिंपळे गुरव तसेच अंतर्गत भागात जाण्यासाठी भुयारी मार्गच आहे. येथील परिसरात चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुणे शहरातून ये-जा करणार्‍या वाहनांची सतत मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.
रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सायंकाळी गर्दी दिसून येते. येथील परिसरात औंध रुग्णालयासारखे सर्वात मोठे रुग्णालय आहे.

येथील रुग्णालयात थेट प्रवेश करण्यासाठी या भुयारी मार्गाला जोडण्यात आले आहे. रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने याच ठिकाणी आरोग्याची समस्या उद्भवत असल्याने नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा रुग्णालय, सांगवी, पिंपळे गुरवसाठी जोडणारा भुयारी मार्ग करण्यापेक्षा जर उड्डाणपूल केला असता तर तो अधिक सोयीचा झाला असता असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

बीआरटी प्रशासनास याबाबत माहिती दिली आहे. दुरुस्ती कामकाजासंदर्भात संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. येत्या दोन दिवसात गळती होत असलेल्या ठिकाणचे दुरुस्तीचे काम करून होणारी गळती थांबविण्यात येईल.

                                       -विजयकुमार थोरात, ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी

येथील भुयारी मार्गातून शाळा कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी ये-जा करीत असतात. यावेळी अनेकदा वाहन आल्यास पद पथावरून पायी चालणार्‍या नागरिकांची पाणी साचल्याने तारांबळ उडत आहे. अनेकदा नागरिकांच्या तसेच दुचाकी वाहन चालकांच्या अंगावर पाणी उडत आहे. याचा नाहक त्रास आणखी किती दिवस सहन करायचा एकदा प्रशासनाने सांगावे तरी.
सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्ते

Back to top button