‘चिंचवड, कसबा पोटनिवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न करणार’ : उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस | पुढारी

‘चिंचवड, कसबा पोटनिवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न करणार’ : उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या पक्षांना विनंती करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. भोसरी येथे आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे बुधवार (दि. 25) पत्रकारांशी बोलत होते. चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघ या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी महाविकास आघाडीच्या पक्षांना विनंती करण्यात येईल, असे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले, ‘आम्हाला महाविकास आघाडीच्या पक्षांनी केलेली विनंती आम्ही अनेक वेळा मान्य केली आहे. त्यामुळे ही विनंती मान्य करायची की नाही, हे त्यांनी ठरवायचे आहे. मात्र, मला असे वाटते आता तरी, हे सर्वांसाठीच उचित राहील की निवडणुका न होता बिनविरोध पद्धतीने या निवडी व्हायला हव्या.’

चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, या दृष्टीने भाजपच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरात पदाधिकार्‍यांची पूर्वतयारी बैठक घेऊन आढावा घेतला, तसेच निवडणुकीत जर महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दिल्यास काय तयारी ठेवावी लागेल, याची चाचपणी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीदेखील या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याने याबाबत काय निर्णय होतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

चिंचवडमध्ये कोणतीही रस्सीखेच नाही
चिंचवडमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रस्सीखेच पाहण्यास मिळत असल्याचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले, ‘मला कोणतीही रस्सीखेच पाहण्यास मिळत नाही. येथील उमेदवारीबाबत विचारपूर्वक आणि एकमताने निर्णय घेण्यात येईल.’

Back to top button