धायरीतील पथदिवे अखेर सुरू; सुतार आळीत नागरिकांत समाधान | पुढारी

धायरीतील पथदिवे अखेर सुरू; सुतार आळीत नागरिकांत समाधान

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : धायरी येथील सुतार आळी परिसरात पथदिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत दैनिक ‘पुढारी’त नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच पथदिवे सुरू न केल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने कंदील मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाचे कार्यकर्ते धनंजय बेनकर यांनी दिला होता. या सर्वांची दखल घेत महापालिकेच्या विद्युत विभागाने मंगळवारी पथदिवे सुरू केले. सुतार आळी परिसरात अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याने रहिवाशांना अंधारात चाचपडत ये-जा करावी लागत होती.

चोर्‍या, घरफोड्यांच्या घटना परिसरात वाढल्याने नागरिक धास्तावले होते. पथदिवे सुरू झाल्याने शेकडो रहिवाशांची गैरसोय दूर झाली असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. स्थानिक रहिवासी कैलास रायकर, प्रवीण रायकर आदींनी याबाबत दैनिक पुढारीचे आभार मानले आहेत.

सुतार आळी भागात दोन हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. बेनकर म्हणाले की, परिसरात पर्यायी व्यवस्था न करता महापालिकेने दिवे बंद केले होते. अनेक महिन्यांपासून तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत होते. मात्र, दैनिक ‘पुढारी’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने दखल घेतली. धायरी गावात वीज आली तेव्हापासून सुतार आळीतील विजेच्या खांबावर पथदिवे होते.

पथदिव्यांचे खांब काढून तेथे विजेचे फिडर बसविण्यात आले. दाटीवाटीने घरे, इमारती व अरूंद गल्लीबोळ असल्याने पथदिव्यांसाठी जागा नाही. त्यामुळे ग्रामपंचायत काळापासून घरमालकांच्या संमतीने वेगवेगळ्या ठिकाणी घराच्या भिंतीवर पथदिवे बसविण्यात आले होते. घरांच्या भिंतीवर पथदिवे असलेले धायरी हे या भागातील एकमेव गाव असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सुतार आळी परिसरातील पथदिवे सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार विद्युत विभागाचे उपविभागीय अधिकारी सूर्यभान जाधव यांच्या देखरेखीखाली कर्मचार्‍यांनी बंद असलेले सर्व पथदिवे सुरू केले आहेत.

                                                                          – प्रदीप आव्हाड,
                                               सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

 

Back to top button