पुणे : वैद्यकीय अधीक्षक, अधिकार्‍यांच्या जबाबदार्‍या होणार निश्चित | पुढारी

पुणे : वैद्यकीय अधीक्षक, अधिकार्‍यांच्या जबाबदार्‍या होणार निश्चित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 23 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील वैद्यकीय अधीक्षक, अधिकार्‍यांची जबाबदारी आणि कर्तव्ये निश्चित होणार आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती दासवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अहवाल देणार आहे. अधीक्षकांप्रमाणेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे पदही तितकेच महत्त्वाचे आहे.

त्यांच्याही जबाबदार्‍या अद्याप लेखी स्वरूपात निश्चित नाहीत. याबाबतचा अहवाल सादर करण्याचे शासनाला कळवण्यात आले आहे. त्यानुसार या समितीला आपला अभिप्राय तत्काळ सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी ही समिती गठीत केली आहे.

वैद्यकीय अधिकार्‍यांची ड्यूटी लावण्यापासून महत्त्वाची प्रशासकीय कर्तव्ये पार पाडण्याची, रुग्णालयात देखरेख करण्याची, समित्यांचे कामकाज सांभाळण्याची महत्त्वाची जबाबादारी या पदाला आहे. पण, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून लेखी स्वरूपात या पदाची कर्तव्ये व जबाबदारी अद्याप निश्चित नाही. जे आहे ते केवळ वर्षानुवर्षे प्रचलित आहे. त्यामुळे या पदाचे सेवाप्रवेश नियम निश्चित करण्यासाठी ही समिती गठीत केली आहे.

अभ्यासासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना
अशी आहे समिती
डॉ. भारती दासवाणी, वैद्यकीय अधीक्षक, बीजे वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय, पुणे – अध्यक्ष
डॉ. भालचंद्र चिखलकर, वैद्यकीय अधीक्षक,
जी. टी. हॉस्पिटल, मुंबई – सदस्य
डॉ. प्रदीप बोडके, वैद्यकीय अधीक्षक,
शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज, नांदेड – सदस्य
डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधीक्षक,
जे. जे. हॉस्पिटल – सदस्य सचिव

राज्यातील अधीक्षकांची जबाबदारी आणि कर्तव्ये काय आहेत, ते स्पष्ट करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. त्याचा अहवाल लवकरात लवकर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला देण्यात येईल.

                                – डॉ. भारती दासवाणी, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय

 

Back to top button