पुणे : जाहिरातींमुळे गुदमरतोय झाडांचा जीव! खिळे ठोकल्याने विपरीत परिणाम | पुढारी

पुणे : जाहिरातींमुळे गुदमरतोय झाडांचा जीव! खिळे ठोकल्याने विपरीत परिणाम

माऊली शिंदे

पुणे : नगर रोडवरील अनेक झाडांवर खिळे ठोकून जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. यामुळे झाडांचा जीव गुदमरत असून, त्यांचे नुकसान होत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जाहिरात करणे हे व्यवसायवृद्धीसाठी महत्त्वाचे असते. त्यासाठी उद्यान विभाग व वाहतूक पोलिसांचे मना-हरकत प्रमाणपत्रफ घ्यावे लागते. तसेच, जाहिरातीसाठी परवानगी घेताना शुल्क भरावे लागते. पथ दिव्यांवर आणि झाडांवर जाहिरात फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी दिली जात नाही.

मात्र, काही जण परवानगीच्या कटकटीतून सुटका होण्यासाठी अवैधपणे जाहिरात फलक लावत असल्याचे चित्र नगर रोड परिसरात दिसून येत आहे. वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी, चंदननगर तसेच नगर रस्त्यावरील झाडांवर खिळे ठोकून जागा विकणे, नो-पार्किंग, खासगी क्लासेस, इंटरनेट सुविधा आदींच्या जाहिराती केल्या जात आहेत.

हॉटेल व्यावसायिक झाडांवर रोषणाई करीत आहेत. या प्रकारांमुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. झाडांवरील जाहिरातबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण देखील होत आहे. मात्र, उद्यान व आकाशचिन्ह विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

झाडांवर होणारे दुष्परिणाम…
झाडांना खिळे ठोकल्यामुळे त्यांचे काष्ट (लाकूड) निकोप राहत नाही, तसेच खोडांना बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यामुळे खाड हळूहळू पोकळ होत जाते. फळाच्या आकारमानावर परिणाम होतो. कालांतराने फळधारणा देखील होत नाही. पत्रे ठोकून झाडांवर जाहिरात केल्यामुळे खोडाची साल निघून जाते व ते कोरडे होते. याला करवा म्हणतात. करवामुळे झाडांची वाढ खुंटत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

आम्ही महिन्यातून एक दिवस झाडावरील जाहिरात काढण्याची मोहीम हाती घेतो. पण, पुन्हा व्यावसायिक जाहिराती लावतात. परिसरामध्ये लवकरच पुन्हा सर्व झाडांवरील जाहिराती आणि खिळे काढण्याची मोहीत हाती घेण्यात येईल.
                                                                – प्रकाश चव्हाण,
                                     उद्यान अधीक्षक, नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय

जाहिरातींसाठी खिळे ठोकल्यामुळे झाडांचे आयुष्य कमी होत आहे. प्रशासनाने झाडावर खिळे ठोकणार्‍यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
                                                          – उध्दव गलांडे,
                                                अध्यक्ष, शिवकर्म प्रतिष्ठान

Back to top button