पौड : छत्रपतींवर खोटे सिनेमे सहन करणार नाही: खा. सुळे यांचे भाजप, मनसेवर टीकास्त्र | पुढारी

पौड : छत्रपतींवर खोटे सिनेमे सहन करणार नाही: खा. सुळे यांचे भाजप, मनसेवर टीकास्त्र

पौड; पुढारी वृत्तसेवा : राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करते. भाजपातील एकाही नेत्याने या वक्तव्याचा जाहीर निषेध केला नाही म्हणजे त्यांना ही वक्तव्ये मान्य आहेत. हरहर महादेव व वेडात वीर दौडले सात, या चित्रपटांमधून चुकीचा इतिहास मांडला आहे. शिवाजी महाराजांवर काढलेले खोटे सिनेमे सहन करणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मेळावा शेळकेवाडी येथे पार पडला. या वेळी खासदार सुळे बोलत होत्या.

या वेळी राजाभाऊ हगवणे, सविता दगडे, रणजित शिवतारे, सुनील चांदेरे, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, पांडुरंग ओझरकर, दूध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, सचिन घोटकुले, कार्याध्यक्ष अंकुश मोरे, कोमल वाशिवले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महरहर महादेवफ चित्रपटाविरोधात भाजप व मनसेनेही प्रतिक्रिया दिली नसून, या दोघांनाही महाराजांचा नाव घेण्याचा अधिकार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी बदला घेतला. यावरून हे सरकार सूडाचे राजकारण करीत असल्याचे सिद्ध होत असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या. पुणे व सातारा जिल्हा परिषदेचे काम देशात उत्तम आहे, असेही सुळे म्हणाल्या.

मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच एक नंबरचा पक्ष राहील. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचा दावा केला. या वेळी राजाभाऊ हगवणे, रणजित शिवतरे, सुनील चांदेरे, सचिन घोटकुले आदींची भाषणे झाली.

अपघातस्थळी पालकमंत्री का गेले नाहीत
कात्रज बायपास येथील नवले पुलावर झालेल्या अपघातावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री असते, तर तेथे गेले असते. स्थानिक आमदार सोडून सरकारकडून घटनास्थळावर कोणीही आले नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Back to top button