भिगवण परिसरात ‘दम मारो दम’; हुक्का पार्ट्या रंगू लागल्या, गुन्हेगारी टोळ्यादेखील सक्रिय | पुढारी

भिगवण परिसरात ‘दम मारो दम’; हुक्का पार्ट्या रंगू लागल्या, गुन्हेगारी टोळ्यादेखील सक्रिय

भरत मल्लाव

भिगवण : तेरा प्यार, प्यार हुक्का मार… मार, दम मारो दम…असे चित्रपटात, शहरी भाग व उच्चभ्रूमध्ये दिसणारे हुक्क्याचे धुराडे आता ग्रामीण भागाच्या गल्लीबोळात पेटू लागले आहेत. किक बसण्यासाठी हुक्काफुक्यांच्या टोळ्या आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. विडी, सिगारेटची क्रेझ तरुणाईत असली तरी हुक्क्याची लत काही वेगळीच असल्याचा समज तळागाळातील तरुणांपर्यंत पोहचला गेला आहे. त्यातही विडी, सिगारेट आरोग्यासाठी अपायकारक मानली जाते.

त्या मानाने हुक्का ओढणे अपायकारक नसल्याचे फालतू समर्थन तरुणांमध्ये बिंबवले गेले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शहरी भागात, तेही उच्चभ्रू वर्गात ओढला जाणारा हुक्का आता गरिबांच्या झोपड्यांत जाऊन पोहचला आहे. हुक्क्याच्या ही झिंग आरोग्याबरोबरच तरुणाईला गुन्हेगारीच्या पाशात ओढू लागली आहे. एकदा का हुक्क्याची चटक लागली की, गुन्हेगारांचे संघटन करणार्‍या टोळ्या अशा तरुणांना हेरून आपल्या पार्टीत खेचत आहेत.

एकदा का संघटन वाढले की गुन्हेगारीतील म्होरक्या समाजात आपला दबदबा निर्माण करण्यास सज्ज होतो. हेच या हुक्का प्रसारामागचे गणित आहे. तरुणही हुक्क्याच्या धुंदीत काहीही करायला तयार राहतात. म्हणूनच गुन्हेगारीचे बळ दिवसेंदिवस वाढते आहे. हा आत्मघातकी प्रवास तरुणांना कळेपर्यंत त्यांचे भान हरपलेले असते आणि त्यातूनच आयुष्याची राखरंगोळी होताना दिसत आहे.

कॅन्सरला मिळतेय आमंत्रण
वास्तविक हुक्क्याचा एक कश शंभर सिगारेटइतका नुकसान करतो, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. हुक्क्यामध्ये असलेल्या कोळशामुळे कार्बन मोनॉक्साईडसह अनेक घातक वायू तयार होतात. 30 ते 40 मिनिटे हुक्का ओढल्याने शरीरातील निकोटिनचे प्रमाण 200 टक्क्यांनी वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. तंबाखू, सिगारेटमुळे जसे कॅन्सरसारख्या भयंकर रोगाला आमंत्रण मिळते तसेच हुक्क्यामुळेही मिळते, यावर तज्ज्ञ डॉक्टर ठाम आहेत.

हुक्क्यात विविध फ्लेवर उपलब्ध
हुक्का सेफ आहे म्हणत तरुणाई यात झिंगत चालली आहे. तरुणाई हुक्क्याकडे अधिक आकर्षित होते हे पाहून आता या हुक्क्यात आकर्षक फ्लेवर तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये फळा-फुलांच्या सुगंधाची फोडणी देण्यात आली आहे. साहजिकच तरुणाईचा ओढा याकडे वाढला आहे.

Back to top button