करमाळा, पुढारी वृत्तसेवा : रावगाव (ता. करमाळा) येथे बुधवारी (दि.22) सायंकाळी साडेचार वाजता सोसाट्याचा वारा आणि कडकटांच्या विजांचे वातावरण झाले होते. यामध्ये वीज अंगावर पडून गावातील येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रावगावात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे.
जयदीप बापू पवार (वय.17) असे या मृत युवकाचे नाव आहे. जयदीप सायंकाळी साडेचारच्या दरम्यान रिमझीम पाऊसामुळे घराबाहेर पावसाचे पाणी साचत होते. मुरुम टाकल्याने पाणी साचणार नाही म्हणून तो मुरूम टाकण्याचे काम करत होता. यावेळी अचानक सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून येऊन वीज कडाडत होत्या. या मध्ये जयदीपच्या अंगावर वीज पडली त्यात तो जखमी होऊन बेशुद्ध झाला.
या घटनेनंतर त्याला रावगाव यथील खाजगी रुग्णालयात आणि नंतर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई व थोरली बहीण असा परिवार आहे. कोरोनामध्ये वडील बापू पवार यांचा मृत्यू झाला होता. अशा विपरीत परिस्थितीमध्ये त्याला समाजाच्या माध्यमातुन आर्थिक मदत केली तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या माध्यमातून शालेय साहित्य व दप्तर देऊन त्याचे शिक्षण चालू केले होते. तो नुकताच इयत्ता बारावी परीक्षेत पास झाला होता. सरकारी अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न होते ते मात्र आता अधुरे राहिले आहे. सदरच्या घटनेनंतर तलाठी बडकणे आणि कोतवाल बाजीराव पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या नतंर रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यातील विविध ठिकाणी वीज पडल्याने जनावरांचा मृत्यू झाला आहे. टाकळी येथे एक शेळी, वरकुटे येथे एक म्हैस वीज पडून ठार झाली आहे. मुऱ्हा जातीची म्हैस अंदाजे 6 वर्षे वयाची अचानक वीज पडून मयत झाली आहे. या घटनांची माहिती महसुल प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा :