अकलूजच्या बाजारात घोडे दाखल होण्यास प्रारंभ! 32 घोड्यांची विक्री | पुढारी

अकलूजच्या बाजारात घोडे दाखल होण्यास प्रारंभ! 32 घोड्यांची विक्री

बावडा; पुढारी वृत्तसेवा: राज्यात प्रसिद्ध असलेल्या अकलूज येथील दीपावली घोडे बाजारामध्ये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच घोडे दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. आजअखेर सुमारे 270 घोडे दाखल झाले आहेत. या घोडे बाजाराचा शुभारंभ दीपावली पाडव्याला होणार असून, तोपर्यंत सुमारे 2 हजार 500 घोडे दाखल होतील, असा अंदाज आहे.

अकलूजचा घोडेबाजार सन 2009 पासून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. या बाजारात दीपावलीपूर्वी महिनाभर व दीपावलीनंतर एक महिना घोड्यांची खरेदी-विक्री चालते. सद्या देशभरातून घोड्यांची बाजारात आवक सुरू असून, आजअखेर 32 घोड्यांची विक्रीही झाली आहे, अशी माहिती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व सचिव राजेंद्र काकडे यांनी दिली.

कोरोनामुळे दोन वर्षे घोडेबाजार भरला नव्हता. चालू वर्षी देशातील राजस्थान, पंजाब, गोवा, गुजरात, बिहार, केरळ, तमिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाना, उत्तर प्रदेश, आंध प्रदेश आदी राज्यांतून जातिवंत घोड्यांची आवक सुरू आहे. या बाजारात देशभरातून आलेल्या ग्राहकांकडून सुमारे 1 लाखापासून 25 लाखांपर्यंत घोड्यांची खरेदी केली जाते. बाजार समितीकडून वीज, पाणी, अंतर्गत रस्ते, सुरक्षा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मदनसिंह मोहिते पाटील व राजेंद्र काकडे यांनी दिली. या घोडेबाजारामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button