सेल्फी पॉइंट परिसर खड्डेमय; नर्‍हे येथील चित्र; नागरिकांची गैरसोय | पुढारी

सेल्फी पॉइंट परिसर खड्डेमय; नर्‍हे येथील चित्र; नागरिकांची गैरसोय

धायरी; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रस्ता परिसरातील नर्‍हे गावात मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवारस्त्यावर सेल्फी पॉइंट परिसरात मोठमोठे खड्डे पडून संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साठल्यानंतर तेथे खड्डे असल्याचे चालकांना दिसून येत नाही.

यामुळे या खड्ड्यांत वाहने जोरात आदळतात. अनेक दुचाकींना या खड्ड्यांत दुचाकी आदळल्याने अपघात झाले आहेत. या अपघातात दुचाकीचालक जखमीही झाले आहेत. या परिसरात मोठमोठे गृहप्रकल्प, हॉस्पिटल, अनेक शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, औद्योगिक वसाहती असल्यामुळे सतत या रस्त्यावरून वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर होत असते. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथून जाणारे विद्यार्थी, नागरिक, वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत.

‘पुणे महानगरपालिका रस्ते विभागाच्या अधिकार्‍यांना वेळोवेळी सांगण्यात आले आहे. परंतु या रस्त्यावर पडलेले खड्डे खडी टाकून बुजविण्यात येऊन तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. त्यांनतर थोडा जरी पाऊस पडला की पुन्हा येथे जैसे थे परिस्थिती होते. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून त्यावर डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेतील’, असे मत सामाजिक कार्यकर्ते बाप्पूसाहेब पोकळे यांनी व्यक्त केले

पावसामुळे परिसरात झालेले खड्डे त्वरित बुजवून डांबरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात येईल.
                                                                   नरेश रायकर,
                                                        उपअभियंता, पुणे महानगरपालिका

Back to top button