धायरी : विद्यार्थिनींनी गिरवले ‘गुड टच, बॅड टच’चे धडे! | पुढारी

धायरी : विद्यार्थिनींनी गिरवले ‘गुड टच, बॅड टच’चे धडे!

धायरी; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘सॅनिटरी नॅपकिन बँक आपल्या आरोग्यासाठी’ या अभिनव उपक्रमात बुधवारी एका दिवसात तब्बल 1800 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या वेळी त्यांना गुड टच, बॅड टचचे प्रशिक्षणही देण्यात आले.
धायरी येथील काका चव्हाण शाळेसह विविध पाच शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान, धायरी यांच्या वतीने इयत्ता 7 वी ते 12 वीच्या विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन बँक, गुड टच- बॅड टचचे शिक्षण देणारा उपक्रम राबविण्यात आला. ‘सॅनिटरी नॅपकिन बँक- आपल्या आरोग्यासाठी’ या उपक्रमाअंतर्गत शालेय तसेच महाविद्यालयीन मुलींना मोफत दरमहा सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येत आहे.

यासाठी शाळा- महाविद्यालये यांच्याशी समन्वय ठेवण्यात येतो. मुलींची नोंदणी करून त्यांना ओळखपत्रे दिली जातात. दर महिन्याला ओळखपत्र दाखवत, नोंद करून घेत शाळा – महाविद्यालयांतच मुलींना सॅनिटरी पॅड दिले जाते. बुधवारी झालेल्या कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकीन बँकसाठी नोंदणी करण्यासोबतच मुलींना गुड टच- बॅड टचचे शिक्षण देणारी चित्रफित दाखविण्यात आली. या वेळी डॅाक्टरांच्या टीमकडून मुलींना सॅनिटरी नॅपकिनचा वापर, चांगले आरोग्य राखण्यासाठी काळजी याबाबत
मार्गदर्शन करण्यात आले.

“मुलींना योग्य शिक्षण मिळाले तर सक्षमतेकडे वाटचाल सुरू राहते. त्यांच्या शिक्षणात, आरोग्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी आयोगाकडून सॅनिटरी नॅपकिन बँक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या बँकेत मुलींना दरमहा शाळेतच नॅपकिन दिले जातात. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचे आरोग्य जपण्याचा हा प्रयत्न आहे. स्त्रियांना उपजत स्पर्शाची जाणीव असतेच; पण लहान वयातच याबाबत मुलींना जागरूक व सतर्क केल्यास अनेक गोष्टी रोखता येऊ शकतात. मुलींना सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘गुड टच, बॅड टच’बाबत व्हिडीओ फिल्ममधून शिक्षण देण्यात येत आहे. विविध शाळांमध्ये मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आमचाही उत्साह वाढवणारा आहे.”

                                       – रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

या शाळेत झाली विद्यार्थिनींची नोंदणी
काका चव्हाण शाळा- धायरी, शिवभूमी शाळा-खेडशिवापूर, महात्मा गांधी विद्यालय-खानापूर, यशवंत विद्यालय- खडकवासला, विमलाबाई नेर्लेकर विद्यालय-रामनगर खडकवाडी, या 5 शाळांमध्ये झालेल्या कार्यक्रमांत 1800 मुलींची नॅपकिन
बँकेत नोंदणी करण्यात आली आहे.

Back to top button